मकर संक्रांतीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात, त्यामुळे याला ‘पतंगांचा सण’ असेही म्हटले जाते. मकर संक्रांती सणाच्या अगदी आधी,नायलॉन किंवा कोणत्याही सिंथेटिक पदार्थापासून बनविलेल्या आणि / किंवा सिंथेटिक पदार्थाने लेपीत असलेल्या अविघटनशील (नॉन-बायोडिग्रेडेबल) मांजा किंवा धागे वापरण्यास आपल्या देशात बंदी आहे आणि कोणीही त्याचा वापर करताना पकडले गेले तर त्याला कठोर शिक्षेची तरतूद आहे.
अनेक लोक पतंग उडवण्यासाठी चायनीज मांजा किंवा काचेच्या लेपित धाग्यांचा वापर करतात, जे पूर्णपणे कायद्याच्या विरुद्ध आहे आणि ही कृती प्राणी व पक्षी तसेच मानवांसाठी धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. पतंग उडवताना पशू, पक्षी आणि माणसे अशा मांजांमुळे जखमी होतात आणि त्यांचे मृत्यूही होतात असे निदर्शनास आले आहे.
त्या अनुषंगाने मा. राष्ट्रीय हरित लवाद न्यायाधिकरण, दिल्ली यांनी मूळ याचिका क्र. 384/2016 आणि 442/2016 च्या अनुषंगाने दिनांक 11/07/2017 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये पतंग उडवण्यासाठी नायलॉन किंवा कोणत्याही सिंथेटिक पदार्थापासून बनविलेल्या आणि / किंवा सिंथेटिक पदार्थाने लेपित असलेल्या अविघटनशील (नॉन-बायोडिग्रेडेबल) मांजा किंवा धागे यांचे उत्पादन, आयात, साठवणूक, विक्री, खरेदी आणि वापर करण्यास पूर्ण बंदी असल्याबाबत निर्देश जारी करण्यात आलेले आहेत. सिंथेटिक मांजा / नायलॉन धाग्याचे गंभीर दुष्परिणाम लक्षात घेऊन नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रामध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत अवगत केलेले आहे.
पतंग उडवण्यासाठी लोकांना सूती धागा वापरण्याची परवानगी आहे ज्यावर तीक्ष्ण, धातू किंवा काचेच्या घटकांचा लेप अनुज्ञेय नाही. धागा कोणत्याही चिकट थ्रेड-मजबूत सामग्रीपासून मुक्त असावा. चायनीज मांजा किंवा काचेचा कोटेड धागा वापरून पकडलेल्या कोणत्याही पतंग उडवणाऱ्याला कठोर शिक्षेला सामोरे जावे लागेल, कारण ते पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 च्या कलम 5 नुसार जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन असेल. अशा व्यक्तीस 5 वर्षांपर्यंत कारावास किंवा 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. तसेच गेल्या काही वर्षांत या धातूच्या किंवा काचेच्या धाग्याने पक्षी आणि मानव जखमी झाल्याच्या असंख्य अपघातांच्या संख्येमुळे पतंग उडवणे, विक्री, खरेदी, साठवणूक आणि वाहतूक यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे.
महाराष्ट्र शासनाचे ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’, ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ आणि ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण अभियाना’तंर्गत फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त, प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक (ग्रीन फेस्टिवल) सण-उत्सव साजरे करणे अपेक्षित आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा, प्लास्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा, सण समारंभामध्ये टाकाऊ वस्तुंचा व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तुंचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावा, तसेच मकर संक्रातीचा सण पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त साजरा करावा असे आवाहन करण्यात येत आहे.
तरी यावर्षीचा मकर संक्राती सण पर्यावरणपूरक साजरा करुया. सूर्य ज्याप्रमाणे आपली वाटचाल उत्तरेकडे सुरू करतो. तशीच तुमची वाटचालही यशाकडे होवो व या शुभप्रसंगी आपले जीवन आनंदाने आणि समृद्धीने भरून जावो ही सदिच्छा.
Comments
Post a Comment