पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या ओळखपत्रांचे अनावरण ;शिर्डी अभ्यासदौऱ्यात नविन कार्यकारिणी सोबत सदस्यांनी घेतले श्री साईंचे आशिर्वाद
पनवेल (प्रतिनिधी) सामाजिक क्षेत्रात हिरीरीने अग्रस्थानी असणारी पत्रकारांची नोंदणीकृत संस्था म्हणजे पनवेल तालुका पत्रकार विकास मंच. संस्थेच्या प्रथेनुसार नूतन कार्यकारिणीने आज (दि. १६) शिर्डी येथे श्री साईबाबांचे दर्शन घेऊन पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या सर्व सदस्यांना ओळखपत्रे प्रदान करण्यात आली.
ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पत्रकारांचा सहभाग असलेली पनवेल तालुका पत्रकार विकास मंच या संस्थेमध्ये बिनविरोध पदाधिकारी निवडून देण्याची प्रथा आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख उपक्रम केले जातात. आगामी वर्षभरातील वार्षिक कार्यक्रमांचे वेळापत्रक अध्यक्ष मंदार दोंदे यांनी शिर्डी अभ्यास दौऱ्यामध्ये प्रसिद्ध केले. नूतन ओळखपत्रांचे अनावरण झाल्यानंतर प्रत्येक सदस्यांना ते प्रदान करण्यात आले. विद्यमान वर्षामध्ये अध्यक्षस्थानी मंदार दोंदे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटील, खजिनदार पदावर संजय कदम तर सरचिटणीस म्हणून हरेश साठे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात सर्व सदस्यांना पत्रकारितेस उपयुक्त असणाऱ्या मंत्रिमंडळ संपर्क क्रमांक यादी, मंत्री महोदयांचे स्वीय सचिव व ओएसडी यांची संपर्क यादी, सचिवालयातील प्रमुख व्यक्तींच्या संपर्क क्रमांकांची यादी, वार्षिक वेळापत्रक आणि भेटवस्तू देण्यात आली. पुढील दोन महिन्यांमध्ये पनवेल तालुका पत्रकार विकास मंच विनामूल्य नेत्र शिबिर घेणार असल्याची घोषणा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केली तर खजिनदार संजय कदम यांनी ६ एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करणार असल्याचे सांगितले. यावेळी सल्लागार विवेक मोरेश्वर पाटील, अध्यक्ष मंदार दोंदे, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार संजय कदम, सदस्य दत्तात्रय कुलकर्णी, दिपक घोसाळकर,प्रवीण मोहोकर,राजू गाडे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment