लिंब : सातारा तालुक्यातील लिंब येथील सुपुत्र पश्चिम बंगाल येथे बीएसएफमध्ये कार्यरत असलेले जवान सुनील तुळशीदास सावंत (वय ३६) यांचे हृदयविकाराच्या आजाराने दार्जिलिंग येथे निधन झाले .त्यांच्या निधनाने ऐन दसऱ्याच्या सणामध्ये लिंब गावावर शोककळा पसरली आहे .यावेळी त्यांच्या घरासमोर बीएसएफच्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली. मानवंदना देताच त्यांच्या पत्नीने 'भारत माता की जय' ची घोषणा देताच उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले.
बुधवारी सकाळी जवान सुनील सावंत यांचे पार्थिव लिंबमध्ये आणण्यात आले. यावेळी लिंब फाट्यापासून सजवलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी त्यांच्या पार्थिवावर फुले वाहत, औक्षण करत श्रद्धांजली वाहण्यात येत होती. जवान सुनील यांचे पार्थिव घरी आणताच त्यांच्या आई, पत्नी, बहीण, वडील, भाऊ व नातेवाईकांनी फोडलेला टाहो पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी अंत्ययात्रा निघाल्यानंतर चौकामध्ये विविध संस्थांच्या वतीने पार्थिवास हार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी स्मशानभूमीमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले, सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, मंडलाधिकारी प्रभाकर कुलकर्णी, सातारा पंचायत समितीच्या माजी सभापती सरिता इंदलकर, सरपंच ऍड अनिल सोनमळे, अजिंक्यताराचे माजी चेअरमन सर्जेराव सावंत यांच्यासह मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी सुनील यांच्या पार्थिवास वडील तुळशीदास सावंत आणि मुलगा श्रीतेज यांनी अग्नी दिला.
लिंब येथील सर्वसामान्य कुटुंबातील सुनील सावंत यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात देत सन २०१०मध्ये बीएसएफमध्ये लातूर येथे भरती झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंब, तर माध्यमिक शिक्षण श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह विद्यालयात झाले तसेच उच्च माध्यमिक शिक्षण सातारा येथील शिवाजी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. यादरम्यानच ते बीएसएफमध्ये भरती झाले होते. त्यांचे प्रशिक्षण जोधपूर, बिकानेर (राजस्थान) येथे झाले.
सुनील सावंत यांचे नऊ वर्षांपूर्वी सारिका यांच्या बरोबर लग्न झाले असून सुनील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. भाऊ सागर सावंत हेही रंगापाडा (आसाम) येथे आर्मीमध्ये सुभेदार पदावर कार्यरत आहेत.
Comments
Post a Comment