सातत्यपूर्ण उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक
पनवेल / प्रतिनिधी : पत्रकार मित्र असोसिएशन संस्था गेली अनेक वर्षे पत्रकरिता व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी संस्था म्हणून कार्यरत आहे. गेली अनेक वर्षे संस्थेतर्फे विविध सणानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षीही दसऱ्यानिमित्त पनवेलमधील विविध ठिकाणी असणाऱ्या गरीब वस्तीतील लहान मुले व नागरिकांना श्रीखंड वाटप करण्यात आले. दसरा असला कि प्रत्येकाच्या घरी श्रीखंड पदार्थ असतो मात्र ज्यांच्या घरात एक टाइम जेवण देखील शिजत नाही अशा लोकांना श्रीखंड काय असते हे आजही माहित नाही त्यामुळे सणासुदीला त्यांच्याही मुखात गोडधोड पडावे या हेतूने आम्ही हा उपक्रम राबवीत असल्याचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी सांगितले.
सोने म्हणून लुटण्यात येणारी आपट्याची पाने... पिवळ्या-केशरी झेंडूच्या माळा... गोड-धोड पदार्थ आणि नवीन वस्तू घरात आणण्याची लगबग... असं उत्साहपूर्ण वातावरण असतं ते दसरा साजरा करण्यासाठी. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या उक्तीनुसार पनवेल परिसरातील गोर - गरीब लहान मुलांना पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे दसऱ्यानिमित्त नवनाथ नगर, डी मार्ट पुढील गरीब वस्ती, रेल्वे स्थानक जवळील गरीब वस्तीत " श्रीखंड " वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनचे नवी मुंबई अध्यक्ष राहुल बोर्डे, ग्रामीण अध्यक्ष शशिकांत दळवी, विहान महाडिक, युवराज सिनारे आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
Comments
Post a Comment