पनवेल,दि,८: स्त्री आणि पुरूष ही एका रथाची दोन चाके आहेत. महापालिकेप्रमाणे सर्व कार्यालयात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत.वरिष्ठ पदांवर,महापौर पदांवरतीही महिला उत्तम पध्दतीने काम करत आहेत. सर्वच क्षेत्रात महिलांची संख्या वाढत असून, त्यांचा सन्मानही वाढत आहे.असे प्रतिपादन आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी केले.
महिला दिनानिमित्त आज (८मार्च)आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापालिकेच्यावतीने महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.यावेळी उपसंचालक नगररचना ज्योती कवाडे, उपायुक्त कैलास गावडे, आयुक्तांच्या सौभाग्यवती नेहा देशमुख, प्रिती डाके आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी महापालिकेच्यावतीने स्वच्छता महिला कर्मचारी तसेच आशा सेविकांना आयुक्तांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले.तसेच सर्व महिलांना कर्मचाऱ्यांना भेटवस्तु चे वाटप करण्यात आले.यावेळी उपसंचालक ज्योती कवाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महापालिकेच्यावतीने महिला दिनाच्या निमित्ताने 'अस्तित्वाची ओळख' हा महिलांच्या आत्मविश्वासाला प्रेरणा देणारा पवित्रा सावंत यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पवित्रा सावंत यांनी महिलांना आपल्या आयुष्यातले नकारात्मक विचार दूर करून सकारात्मक विचारांना महत्व देण्यास सांगितले.महिलांनी स्वत:ची ओळख जपली पाहिजे,स्वत: आनंदी राहीले पाहिजे, तरच आपले कुटूंब आनंदी राहू शकेल हे सांगताना त्यांनी विविध उदाहरणे सांगितली तसेच पंचतत्वांची माहिती देऊन महिलांनी या पंचतत्वाची शक्ती आपल्या रोजच्या आयुष्यात वापरण्याच्या सोप्या क्लुप्त्या सांगितल्या.याचबरोबर सतीश कोते प्रस्तुत 'रंग कलेचा' हा महाराष्ट्रातील विविध लोककलेची, संस्कृतीची ओळख करून देणारा कार्यक्रम सादर करण्यात आला.यावेळी गण,गवळण, कोळी गीते, लावणी, शेतकरी गीते सादर करण्यात आली. महापालिकेच्या सर्व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी टाळ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
महापालिकेच्या महिला बालकल्याण विभागाच्यावतीने विभाग प्रमुख प्रकाश गायकवाड, कविता मोकल,प्रियांका,पाटील यांचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment