दिवाळी बोनसचा आगळावेगळा आणि भूतो न भविष्यतो असा करार;यंदा शेल इंडियाच्या कामगारांना मिळणार तब्बल ९५ हजार रुपये बोनस
पनवेल(प्रतिनिधी) औद्योगिक क्षेत्रात विशेषतः पगारवाढ किंवा तत्सम करारनामा होत असतो. मात्र तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया मार्केट लिमिटेड कंपनीमधील कामगारांसाठी दिवाळी बोनसचा आगळावेगळा आणि भूतो न भविष्यतो असा करार झाला आहे.
या करारानुसार यंदाच्यावर्षी दिवाळी बोनस म्हणून प्रत्येक कामगाराला तब्बल ९५ हजार रुपये बोनस मिळणार आहे. विशेष हि बाब येथेच थांबली नाही तर पुढच्या वर्षी ०१ लाख ०५ हजार तर त्याच्या पुढील वर्षी ०१ लाख १५ हजार रुपये कामगारांना बोनस मिळणार आहे. आणि कामगिरी केली आहे ती आमदार प्रशांत ठाकूर व कामगारनेते जितेंद्र घरत यांनी. त्यामुळे दिवाळीच्या एक महिन्यापूर्वीच या कंपनीतील ४० कामगारांची दिवाळी झाली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीत शेल इंडिया लिमिटेड नामक ऑइल कंपनी आहे. या ठिकाणी पूर्वी कामगार काँग्रेसची कामगार संघटना कार्यरत होती. मात्र कामगारांनी आपल्या न्यायिक हक्कासाठी शेल इंडिया एम्प्लॉईज संघटनेचे आधारवड म्हणून कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांची सल्लागार तर अध्यक्ष म्हणून कामगारनेते जितेंद्र घरत यांच्या कार्याला पसंती दिली. देशातील सर्वात मोठा असलेला दीपावली सण एक महिन्यावर आला आहे अशातच दिवाळी बोनस हा कामगारांचा नेहमीच जिव्हाळ्याचा प्रश्न राहिला आहे. त्या अनुषंगाने सदर संघटनेकडून कंपनी व्यवस्थापनाला बोनस मागणीचे पत्र देऊन चर्चा घडविण्यात आली आणि त्या अनुषंगाने व्यवस्थापनाने सकारात्मक निर्णय घेत कामगार आणि कंपनी हिताचा निर्णय घेतला. या करारामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण असून त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर, कामगारनेते जितेंद्र घरत यांचे आभार व्यक्त केले.
सदर करारावर संघटनेच्यावतीने अध्यक्ष जितेंद्र घरत, व्यवस्थापनाच्या वतीने मार्केटिंग व्यवस्थापक गुलशन चौधरी, एच आर व्यवस्थापक शशांक शेखर, उत्पादन निर्मिती व्यवस्थापक सागर करुळकर, संघटनेच्या सचिव समीरा चव्हाण, कामगार प्रतिनिधी रामदास गोंधळी, सुनिल पाटील, जयराज जाधव, यासिन शेख, अनिल पावशे, सुनिल हरिचंद्र यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
Comments
Post a Comment