आपटा गावातील मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, युवा नेते विनोद साबळे, विद्याधर मोकल, ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णा पाटील, पं. स. सदस्य तनुजा टेंबे, विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे, किरण माळी, प्रवीण खंडागळे, दिघाटी सरपंच अमित पाटील, माजी सरपंच विजय मुरकुटे, अनिल पाटील, मंगेश वाकडीकर, मुकुंद गावंड, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य योगेश्री मुरकुटे, तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, विद्याधर जोशी, गणेश पाटील, सुनील माळी, फय्याज दाखवे, वासांबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सचिन तांडेल, उद्योगपती बाळूशेठ पाटील,प्रतीक भोईर, सतीश ठाकूर, अतिश ठाकूर, पं. स. अध्यक्ष हिरामण ठाकूर, भाजप गाव अध्यक्ष रामचंद्र मोकल, स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार आहे, मात्र या सरकारचे अस्तित्व दिसत नाही, अशी टीका केली. ते पुढे कि, म्हणाले की, यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात विविध ठिकाणी भरीव विकास झाला, मात्र मागील दोन वर्षांच्या काळात काडीचाही विकास दिसत नाही. असे असताना ही मंडळी केंद्राकडे बोट दाखवतात. त्यांनी हे करण्यापेक्षा राजीनामे द्यावेत. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यास राज्यात विकास होईल. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक अटकेत आहेत. आणखी काही नेते रडारवर आहेत. आघाडी सरकारमधील मंत्री तुरुंगात जात असताना राजकीय विरोधातून भाजपच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, परंतु न्यायालयाने निर्दोष भाजप नेत्यांना दिलासा दिला. त्यामुळे यांचा न्यायालयावर विश्वास नाही. काय म्हणायचे यांना. संपूर्ण राज्य सध्या अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे, असे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी म्हटले.
शेकापचे अस्तित्व जवळपास रायगड जिल्ह्यातून संपुष्टात येत असल्याचे चित्र आहे. कधी काळी या शेकापचे रायगडात वर्चस्व होते. एक खासदार, तीन-चार आमदार, जिल्हा परिषद, जिल्हा बँक, गावची सोसायटीसुद्धा शेकापची असायची, पण आज एकही आमदार नाही. कुठेही नामोनिशाण नाही. येत्या काळात शिवसेना, शेकापचे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते भाजपचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते दरेकर यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले कि, आपल्यातील अनेकांनी राजकारण वयाच्या अठरा वर्षापासूनच बघितले आहे. राजकारणाची आवड पिढ्यानपिढ्या आपल्या सर्वांच्या नसानसात आहे. पण मी तुम्हाला विश्वासाने सांगतो कि तुम्ही भाजपात प्रवेश करून चांगला निर्णय घेतला आहे. सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्राप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी काम केले आहे. २०१४ साली भाजपचे २८३ खासदार निवडून आले, त्यांनतर २०१९ ला ३०३ खासदार जिंकून आले ते फक्त कामाच्या जोरावर झाले आहे. देशात जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भूतो न भविष्यतो विकासकामे करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या माध्यमातून होत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतीने विकास पुरुष म्हटले जाते. त्यांचे आडनाव गडकरी असले तरी देशातील लोकं आणि विविध पक्षातील खासदार त्यांना रोडकरी म्हणून संबोधतात. इतके रस्ते त्यांच्या माध्यमातून देशात तयार झाले आहेत. नुकताच पनवेलमध्ये ३५०० कोटी रुपयांच्या कामाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले, ते इथवर थांबले नाहीत १२०० कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन केले आणि ३००० कोटी रुपयांच्या रस्त्यांची घोषणाही त्यांनी केले. त्यामुळे त्यांचे गोडवे पनवेल उरण खालापूरकर एक दोन वर्षे नाही दहा वीस वर्षे गात राहतील. गडकरी साहेबांचे कौतुक करू तेवढे कमी आहेत आणि यासाठी आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागले आहे. या पूर्वीच्या आमदारांनी या भागात लक्ष दिले नाही पण आमदार महेश बालदी यांनी विशेष लक्ष देत विकासाचा झंझावात सुरूच ठेवला आहे. निवडणुकीच्या काळात जातीचे राजकारण करण्यात आले पण आमदार महेश बालदी यांनी त्याची तमा न बाळगता आगरी, कोळी, मराठा, मुस्लिम, मागासवर्गीय अशा सर्व बहुजन समाजासाठी काम केले म्हणूनच ते जिंकून आले आणि सर्व समाजाचा विश्वास पाठिंबा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, आणि आमदार महेश बालदी यांच्या दूरदृष्टीतून यापुढेही या मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास होईल, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना आश्वासित केले.
या वेळी बोलताना जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत म्हणाले की, याआधी शेकापमध्ये असताना आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध जात होतो. त्यात आमची दमछाक होत होती. अखेर आम्ही ठरवले की प्रवाहाबरोबर जाऊ. त्यामुळे दमछाक होणार नाही आणि इच्छित स्थळीही लवकर पोहचू, तर आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील यांनी, येत्या काळात आपटा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकून दाखवेन हे माझे विरोधकांना खुले आव्हान आहे. त्याचप्रमाणे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही आम्ही भाजप उमेदवाराला येथून मोठे मताधिक्क्य देऊ, असे सांगितले.
Comments
Post a Comment