नवी मुंबई महानगरपालिका- कंत्राटी कामगारांनाही कोव्हीड विशेष भत्ता देण्याच्या आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या निर्णयाबद्दल आनंद
कोव्हीड विरोधातील लढ्यात नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारीवृंदाप्रमाणेच कंत्राटी कामगारांनीही आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडलेले आहे याची जाणीव ठेवत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी कायम अथवा करार पध्दतीने कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना अदा करण्यात आलेला प्रतिदिन रू. 300/- प्रमाणे विशेष भत्ता कंत्राटी कामगारांनाही देण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. दि. 23 मार्च 2020 ते 14 एप्रिल 2020 तसेच 15 एप्रिल 2020 ते 31 मे 2020 या कालावधीकरिता कंत्राटी कामगारांच्या उपस्थितीनुसार हा कोव्हीड विशेष भत्ता देण्यात येणार असून तशा प्रकारचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. आपण कोव्हीडच्या कठीण काळात केलेल्या कामाची जाणीव ठेवत आयुक्तांनी विशेष भत्ता दिल्याबद्दल कंत्राटी कामगारांमार्फत आनंद व्यक्त करण्यात येत आहे.*
*कोव्हीड विरोधातील लढ्यात नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचा समुहाने सन्मान 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाला. यामध्ये प्रामुख्याने चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचा समावेश असावा असे स्पष्ट निर्देश आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले होते. समारंभातील मनोगतातही या श्रमजीवी वर्गाचा त्यांनी विशेष उल्लेख केला. मागील दीड वर्षातील प्रत्येक समारंभात आयुक्तांनी स्वत: कोणताही सत्कार न स्विकारता चांगले काम करणा-या चतुर्थ श्रेणी व कंत्राटी कामगारांच्या सत्काराला प्राधान्य दिले आहे. श्रमजीवी कामगार वर्गाविषयी हीच आपुलकीची भावना जपत महापालिका आयुक्तांनी कंत्राटी कामगारांना कोव्हीड भत्ता देण्याचा कामगार कल्याणकारी निर्णय घेतलेला आहे.*
देशातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनामार्फत दि. 23/03/2020 ते दि. 14/04/2020 या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये ल़ॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. सदर लॉकडाऊन कालावधीत सर्व लोकल रेल्वे सेवा / परिवहन सेवा व इतर दैनंदिन प्रवासी सेवा बंद करण्यात आलेल्या होत्या. तथापि नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी / कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेतील अधिकारी / कर्मचारी (फ्रंट लाईन वर्कर) असल्याने साथरोग (Pandemic) संबधित उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने कार्यालयात उपस्थित होते. लॉकडाऊन कालावधीत सर्व दैनंदिन सेवा, हॉटेल, भोजनालये बंद ठेवण्यात आली असल्याने, कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांकरिता भोजनाची व्यवस्थाही उपलब्ध नव्हती. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी लॉकडाऊन कालावधीत त्यांना सोपविलेली जबाबदारी जोखीम पत्करुन योग्यरित्या पार पाडली आहे. याची नोंद घेत 23 मार्च ते 14 एप्रिल आणि 15 एप्रिल ते 31 मे 2020 या कालावधीत कार्यालयात उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या उपस्थितीनुसार प्रतीदिन रु. 300/- विशेष भत्ता अदा करण्यात आला होता. तसेच करार पध्दतीवरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या उपस्थितीनुसार विशेष भत्ता अदा करण्यात आलेला आहे.
सदर कालावधीत नवी महानगरपालिकेतील विविध विभागांतर्गत कार्यरत ठेकेदारांच्या अधिपत्याखालील कंत्राटी कामगारांनी देखील जोखीम पत्करुन कर्तव्यावर हजर राहून त्यांचेवर सोपविलेली जबाबदारी, कर्तव्य़ योग्यरित्या पार पाडली आहे. त्यानुसार कायम व करार पध्दतीने कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना अदा करण्यात आलेला विशेष भत्ता कंत्राटी कर्मचा-यांना देखील देण्यात यावा, असे अंतरिम आदेश मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी 27 मे 2020 रोजी निर्गमित केले होते. त्यास अनुसरून विविध ठेकेदारांकडील कंत्राटी कर्मचा-यांनाही या कालावधीत केलेल्या कामाचा प्रतिदिन रु. 300/- याप्रमाणे विशेष भत्ता त्यांच्या उपस्थितीनुसार अदा करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक श्री.अभिजीत बांगर यांनी निर्गमित केलेले आहेत. संबंधित विभागप्रमुख यांनी त्यांच्या अधिपत्याखालील संबंधित ठेकेदारांमार्फत त्यांचेकडील कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांना निश्चित कालावधीकरिता त्या कर्मचा-याच्या उपस्थितीनुसार विशेष कोविड भत्ता अदा करावा असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
*कोरोना प्रभावीत कालावधीत ज्या कंत्राटी कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे अशा कामगारांच्या वारसांना रु. 5 लक्ष सानुग्रह अनुदान देणेबाबत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी तत्परतेने निर्णय घेत कार्यवाहीस सुरूवात झालेली आहे. त्यानंतर लगेचच कोव्हीड विषयक काम करणा-या कंत्राटी कर्मचा-यांनाही कोव्हीड भत्ता देण्याविषयी तत्परतेने निर्णय घेतल्याबदद्ल या सर्वसमावेशक व सर्वांना समान न्याय देण्याच्या भूमिकेचे सर्व संघटना व सफाई कामगार यांनी स्वागत करीत समाधान व्यक्त केले आहे.*
Comments
Post a Comment