पनवेल (संजय कदम) : पनवेल परिसरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणार्या तीघा बांगलादेशीयांविरोधात पनवेल मा.न्यायालयाने सजा सुनावली आहे. यामुळे अशा प्रकारे आपल्या चाळीत किंवा घरात नियमाचे उल्लंघन करून बांगलादेशीयांना वास्तव्य करून देणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरेपाडा येथील म्हात्रे चाळ या ठिकाणी अनधिकृतरित्या तीन घुसखोर बांगलादेशीय नागरिक राहत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर व त्यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकून श्रीमती.लाखी गुलाम मालिक (45), मासुद राणा इंदुशेख (27) व श्रीमती.जमुना मासुद राणा शेख (21) व सोबत लहान मुलगी कु.नाजिया (1) यांना ताब्यात घेवून त्यांच्या अधिक चौकशीमध्ये त्यांनी कोणतीही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय अवैध मार्गाने भारत-बांगला सिमेवरुन लपत छपत भारतात प्रवेश करून पनवेल परिसरात अनधिकृतपणे वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाल्याचे त्यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात पारपत्र (भारतात प्रवेश), नियम 1950 चे कलम 3 (ए), 6 (ए) सह विदेशी नागरिक अधिनियम 1946 चे कलम 14 (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर आरोपींवर तपासअंती न्यायालयात पुराव्यासह दोषारोपत्र सादर करण्यात आले होते. सदर खटल्याची मा.न्यायालयाने सुनावणी सुरू केली. परंतु आरोपींनी सदरचा गुन्हा कबुल न केल्याने साक्षी पुरावे नोंदविण्यात आले व सुनावणी अंती मा.जेएमएफसी पनवेल न्यायालय इंदलकर यांनी तीन्ही आरोपींना सदर खटल्यात दोष सिद्ध ठरवून त्यांना विदेशी नागरिक अधिनियम कलम 14 अन्वये 02 वर्षे सक्तमजूरी व 1 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी सजा सुनावली आहे. सदर आरोपींना सजा होण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्यासह तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार, कोर्ट पैरवी पोलीस हवालदार अजित म्हात्रे व त्यांच्या पथकाने विशेष मेहनत घेतली आहे.
पनवेल तालुक्यात व परिसरातील नागरिकांनी व चाळ मालकांनी आपल्या रुम किंवा ब्लॉक किंवा गाळे भाड्याने देताना संबंधित व्यक्तीची शहानिशा करावी, आवश्यक ते सर्व कागदपत्रे त्याच्याकडून ताब्यात घ्यावेत तसेच याची माहिती वेळोवेळी पोलीस ठाण्यात कळवावी. अशा प्रकारे बांगलादेशीयांना वास्तव्यास ठेवल्यास संबंधित व्यक्तीवर शासकीय नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल. तरी अशा व्यक्तींना कोणीही वास्तव्यास ठेवले असेल तरी त्याची माहिती पोलीस ठाण्यात द्यावीत.
—वपोनि रवींद्र दौंडकर
Comments
Post a Comment