पनवेल (संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील विविध नियमांचा भंग केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे त्यानंतर शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे अखेरीस रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दोन बारचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश काढले आाहेत.
विविध नियमांचा भंग केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यातील कोन गावाच्या हद्दीतील साईदर्शन व साईराज बारवर रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी धडक कारवाई करून या दोन्हीही बारचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
बार मधील महिला वेटर्स व गिर्हाईके यांच्यात अश्लील हातवारे, बीभत्स वर्तन होत असल्याबाबत यापूर्वी पनवेल तालुका पोलिसांकडे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. याबाबत वपोनि रवींद्र दौंडकर व त्यांच्या सहकार्यांनी गुन्हे दाखल करून देखील वारंवार नियमांचा भंग करून बार चालवण्यात येत असल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी धडक कारवाई करून या दोन्ही बारचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत.
पनवेल तालुक्यातील कोन गावाच्या हद्दीतील हॉटेल साईदर्शन बार येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेल येथील दुय्यम निरिक्षकांच्या पथकाने 21 फेब्रुवारी 2022 रोजी अचानक भेट देऊन परवान्याच्या अनुषंगाने पाहाणी केली. त्याचप्रमाणे याच परिसरातील हॉटेल साईराज बार येथे देखील पनवेल दुय्यम निरिक्षकांच्या पथकाने 16 फेब्रुवारी 2022 रोजी अचानक भेट देऊन देऊन परवान्याच्या अनुषंगाने पाहाणी केली असता त्याठिकाणी अनेक अनियमितता आढळून आल्या. त्याचबरोबर बार मध्ये काम करणार्या कामगार नोंदीच्या अपूर्ण वह्या व पाच महिला विना नोकरनामा येथे काम करताना पथकाला चौकशीदरम्यान आढळून आल्या. बारकरिता मंजूर जागेपेक्षा अधिक जागा वापरण्यात येत असल्याचेही चौकशीदरम्यान निदर्शनास आले होते.
तसेच महिला वेटर आणि गिर्हाईके यांच्यात असभ्य वर्तन होत असल्याचे वारंवार निदर्शनास आल्याने व अनेकदा वेळेच्या नियमांचा भंग केल्याचेही निदर्शनास आल्याने यापूर्वीही बार वर अनेक अदखलपात्र गुन्हे नवी मुंबई आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ-2 पोलिसांनी दाखल केलेले आहेत.
तसेच पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर व त्यांच्या पथकाने या विरोधात वेळोवेळी कारवाई करून याचा अहवाल सुद्धा वरिष्ठांना सादर केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर या दोन्हीही बारकडून विविध प्रकारच्या नियमांचा भंग झाल्याप्रकरणी जिल्हाधिकार्यांसमोर दोन्हीही बारबाबत सुनावणी पार पडली.
अखेर या दोन्हीही बारच्या अनेक नियमभंगतेबाबत जिल्हाधिकार्यांनी धडक कारवाईचा बडगा उगारून हॉटेल साईदर्शन व साईराज या दोन्हीही बारचे परवाने कायमचे रद्द करण्याचे आदेश पारित केले आहेत. जिल्हाधिकार्यांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे पनवेल तालुक्यातील अवैध बार चालकांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.
Comments
Post a Comment