पनवेल (संजय कदम) ः शारिरीक अपंगत्वावर मात करीत पनवेलमधील एका तरुणाने यशाचे शिखर गाठताना इंटरनेट मार्केटींग, एरलिक मिडीया या कंपनीची स्वतः स्थापना करून त्यात घवघवीत यश मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
पनवेलमधील मध्यमवर्गीय कुटुंबियात वास्तव्यास असलेला परिक्षित शहा याला जन्मतः शारिरीक अपंगामुळे दुसर्याच्या आधाराशिवाय जागेवर थोडाही हलू शकत नव्हता. असे असले तरी शिक्षणाची आवड व ध्यास याच्यावर त्याने अपंगात्वावर सुद्धा मात करीत अंथरुणावर पडूनच आजपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. परिक्षित शहा नुसताच पास न होता दहावीच्या परिक्षेत हा घवघवीत यश मिळवून पुढे आला. त्याची हाडे ठिसूळ असल्यामुळे तो स्वतःच्या पायावर कधीही उभा राहू शकणार नव्हता. त्याला ऑस्टिओजेनेसिस नावाचा आजार असल्यामुळे तो त्याच्या आईच्या आधाराशिवाय एका जागेवरुन दुसर्या जागेवर हलू शकत नव्हता, असेही असताना त्याने दहावी व बारावीची परिक्षा चांगल्या श्रेणीत पास होवून तो यशस्वी झाला. शिक्षणाची मुळातच आवड असल्याने पुढे त्याने 2017 ला पुणे युनिव्हर्सिटीमधून एम.ए. इकॉनॉमिक्स पूर्ण केले. आणि त्याच वर्षी मुंबई युनिव्हर्सिटीमधून पी.एच.डी.ची प्रवेश परिक्षा पण उत्तीर्ण केली. त्याच दरम्यान त्याने व त्याचा सहकारी चिन्मय शर्मा (गुवाहाटी) यांनी मिळवून 2018 ला एरलिक मिडीयाची सुरूवात केली. व सध्या तो पूर्णवेळ यात काम पाहत आहे. पुढे त्याने पी.एच.डी.सुरू केली नाही. कारण त्याचे काम आणि कंपनी या दोघांना पुढे घेवून जाणे महत्वाचे आणि व्यवहार्य वाटलं. आता चार वर्षानंतर मागे वळून पाहताना आपण घेतलेला निर्णय योग्य होता याचा आनंद परिक्षित शहाला आहे. एरलिक मिडीयामध्ये त्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपनीचे ऑनलाईन मार्केटींगचे काम ते बघत आहेत. गेल्या चार वर्षात त्याने अनेक कंपन्या, सेलिब्रिटी, पॉलिटीकल पार्टी आणि छोट्या व्यावसायिकांची कामे केली आहेत. त्यामुळे त्यांची कंपनी देशातील अशा काही कंपन्यांमध्ये आहे ज्यांच्याकडे ऑनलाईन मार्केटींगमध्ये सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. वडिलांचे छत्र लहानपणी हरविल्यानंतर त्याची आई विजयालक्ष्मी शहा यांनी घरी टेलरिंगची कामे केली. परंतु 2011 पासून त्यांना मायग्रेन आणि ब्लडप्रेशरचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी आता पूर्णपणे काम बंद केले आहे आणि त्या घरीच असतात. अशा परिस्थितीत सुद्धा त्याने आपले शिक्षण पूर्ण केले व आगामी काळात सुद्धा अशाच प्रकारे कंपनीचा व्यवसाय देशभरासह परदेशात सुद्धा वाढविण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment