पनवेल (प्रतिनिधी) विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला…. खेळ मांडीयेला वाळवंटी ठाई…… पतित तू पावना पवना….. ये गं ये गं विठाबाई... या अभंगांच्या तालावर संत मंडळी आणि वारकरी यांची मांदियाळी पनवेलमध्ये अवतरली होती.... निमित्त होते श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भाजपा महिला मोर्चा आयोजित ‘नाच गं घुमा. पनवेल प्रस्तुत ‘संतांची मांदियाळी ‘या नाट्यकृतीचे. संत निवृत्तीनाथा पासून ते संत रामदासा पर्यंतची संत परंपरा, त्यांचे विचार, समाज सुधारण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि केलेल्या रचना यामुळे पनवेल नगरीचं वातावरण भक्तिमय झालं होतं. महिला दिनाचं औचित्य साधून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्य गृहात नाच गं घुमा च्या महिला कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला. पहिल्यांदाच पनवेल मध्ये सादर झालेला हा कार्यक्रम हाउसफुल्ल झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, वर्षा ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी अर्चना ठाकूर, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्षा वर्षा नाईक, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, नगरसेविका दर्शना भोईर, डॉ.अमृता नाईक, कल्पना कोठारी यांच्यासह अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दिग्दर्शक शरद दातार यांनी संत कार्याचा प्रसार व्हावा, संतांचा विचार लोकांपर्यंत पोहोचावा ,नवीन पिढीला याची माहिती व्हावी ही नाट्यकृती सादर करण्यामागची भूमिका असल्याचे सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. तसेच आपापल्या क्षेत्रात उत्तम पद्धतीने काम करणाऱ्या महिला आपल्याला मिळालेल्या संधीच सोनं करतात. अशा सर्व यशस्वी महिलांनी आज सर्व महिलांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला याबद्दल यावेळी कौतुकही केले. आमदार प्रशांत ठाकूर यांचं स्वागत दिग्दर्शक शरद दातार यांनी केले. कार्यक्रमाच्या लेखिका आणि नाच गं घुमा संस्थेच्या अध्यक्ष सुनिता खरे यांनी पुणे, रोहा, बुलढाणा, अलिबाग यानंतर पनवेलच्या नाट्यगृहात “संतांची मांदियाळी’ हा कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली असे सांगून आजच्या युगामध्ये सुद्धा संतांनी सांगितलेल्या मार्गावर वाटचाल करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
विठ्ठल -रुक्मिणी, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर ,संत मुक्ताबाई, संत गोरा कुंभार, संत नामदेव, संत जनाबाई, कान्होपात्रा ,शामा नायकीण, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास यांच्या व्यक्तिरेखा यामध्ये साकारण्यात आल्या. विठ्ठल रखुमाईचे संवाद. सर्वच संत कलाकारांचा अभिनय. त्यांनी गायलेले अभंग, कार्यक्रमाचे लेखन- निवेदन यामुळे या कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली. दिंडी, ओव्या, गजर, भारुड ,अभंग या प्रत्येक कलाविष्कारला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नेपथ्य शरद दातार यांचे होते तर पार्श्वसंगीत मकरंद देसाई यांचे होते. सहनिर्मिती मधुरा देसाई, नूतन दातार, स्वाती कोळी, अक्षया चितळे, छोटा कलाकार निनाद कर्वे यांचे होते. गणेश घाणेकर यांची तबला साथ, कर्वे यांचे हार्मोनिम वादन ,सुखदा घाणेकर आणि भागवत यांचे गायन या कार्यक्रमासाठी होते.
Comments
Post a Comment