नवी मुंबई :24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. यावर्षी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 24 फेब्रुवारी ते 30 मार्च 2022 या कालावधीत क्षयरोग विषयक विविध उपक्रम राबविणेबाबत शासनामार्फत सूचित करण्यात आले. आहे. त्यामध्ये एक विशेष उपक्रम म्हणजेच “ACF SUNDAY” अर्थात रविवारी विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम. क्षयरुग्णांचा लवकरात लवकर शोध घेणे व त्यांना उपचाराखाली आणणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही 24 फेब्रुवारी ते 30 मार्च या कालावधीत विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून प्रत्येक रविवारी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचा-यांमार्फत जनजागृती व तपासणी करण्यात येत आहे. याकरिता 28 क्षेत्रीय कर्मचारी कार्यरत असून 3739 नागरिकांची तपासणी करण्यात आलेली आहे.
या मोहीमेदरम्यान 84 संशयित रुग्ण आढळले असून त्यांची मोफत थुंकी तपासणी करण्यात येऊन खाजगी यंत्रणेव्दारे त्यांचे मोफत एक्सरे काढण्यात आले आहेत. यामध्ये क्षयरुग्णांचे निदान होणाऱ्या रुग्णांना महानगरपालिकेमार्फत मोफत उपचार देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक क्षयरुग्णास दरमहा रु.500 उपचार पूर्ण होईपर्यंत डीबीटीव्दारे रुग्णाच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या या विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीमेला नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे व क्षयरोगाची लक्षणे जाणवल्यास महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कर्मचारी यांना सत्य माहिती उपलब्ध करून द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment