नवी मुंबई महानगरपालिका- श्रीगणेशोत्सवात 3 विसर्जन दिवसांमधील 39 टन 915 किलो निर्माल्यावर नैसर्गिक खतनिर्मिती
10 सप्टेंबरपासून सुरू झालेला यावर्षीचा श्रीगणेशोत्सव कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर आंतरिक भक्तीभावाने शासकीय मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत अत्यंत उत्साहात संपन्न होत आहे. विसर्जनस्थळी होणारी गर्दी टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार मागील वर्षीच्या 135 कृत्रिम विसर्जन स्थळांच्या संख्येत सर्वच विभागांमध्ये नागरिकांची मागणी लक्षात घेऊन 16 ने वाढ करीत यावर्षी विभागवार 151 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केलेली आहे.
त्याचप्रमाणे विसर्जनस्थळी एकाच वेळी गर्दी होऊन नये व भाविकांना त्यांच्या सोयीच्या वेळेत विसर्जन करता यावे याकरिता nmmc.visarjanslots.com हे विशेष पोर्टल कार्यान्वित करून 'ऑनलाईन श्रीगणेशमूर्ती विसर्जन स्थळ नोंदणी' सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेचा लाभ बाराशेहून अधिक नागरिकांनी घेत ही संकल्पना यशस्वी केलेली आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक जलस्त्रोत रक्षणाच्या दृष्टीकोनातून कृत्रिम विसर्जन स्थळांवर विसर्जन करण्यास प्राधान्य दिल्याचे पर्यावरणपूरक चित्र दिसून आलेले आहे.
*नवी मुंबईकर नागरिकांचा पर्यावरणशील दृष्टीकोन लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या वतीनेही प्रतिवर्षीप्रमाणेच श्रीमुर्तींसोबत विसर्जनस्थळी येणा-या पुष्पमाळा, फुले, दुर्वा, तुळस, शमी, फळांच्या साली-तुकडे यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे 'ओले निर्माल्य' तसेच मुर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे 'सुके निर्माल्य' ठेवण्यासाठी 22 पारंपारिक विसर्जनस्थळांवर तसेच 151 कृत्रिम विसर्जन स्थळांवर स्वतंत्र निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे.*
*अशाप्रकारे ओले व सुके निर्माल्य वेगवेगळ्या कलशात ठेवण्याच्या संकल्पनेला नागरिकांनी नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सव विसर्जन कालावधीत दीड दिवसाच्या विसर्जनादिवशी 11 टन 95 किलो, गौरीसह पाच दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी 24 टन 140 किलो तसेच सात दिवसाच्या विसर्जनाप्रसंगी 3 टन 680 किलो अशाप्रकारे तीन दिवसात 39 टन 915 किलो इतके ओले निर्माल्य जमा झाले आहे. या निर्माल्याच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच हे निर्माल्य महानगरपालिकेच्या अद्ययावत तुर्भे प्रकल्पस्थळी नेण्यात येऊन त्यावर शास्त्रोक्त खत निर्मिती प्रक्रिया केली जात आहे.*
नवी मुंबई हे स्वच्छतेमध्ये राज्यातील अग्रणी व देशातील तृतीय क्रमांकाचे स्वच्छ शहर म्हणून मानांकीत आहे. यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणात ओडीएफ कॅटेगरीमध्येही वॉटरप्लस हे सर्वोच्च मानांकन संपादन करणारे नवी मुंबई हे राज्यातील एकमेव शहर आहे. जागरूक स्वच्छताप्रेमी नागरिकांच्या बहुमोल योगदानामुळेच ही मानांकने शहरास लाभत आहेत. हेच स्वच्छताप्रेम गणेशोत्सवातही नागरिकांकडून दिसून येत असून विसर्जनस्थळी योग्य कलशांमध्ये ओले व सुके निर्माल्य ठेवले जात आहे.
दि. 19 सप्टेंबर रोजी विसर्जनाच्या दहाव्या दिवशी अर्थात अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणा-या विसर्जन सोहळ्यासाठीही नवी मुंबई महानगरपालिकेने संपूर्ण तयारी केलेली असून सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी स्वयंशिस्त राखत आत्तापर्यंत ज्याप्रमाणे सहकार्य केले तसेच अनंत चतुर्दशीदिनी होणा-या विसर्जनप्रसंगीही करावे आणि कुठेही गर्दी न करता शांततेत श्रीमूर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment