पनवेल, दि.19 (संजय कदम) ः रस्त्याने पायी चालत जाणार्या एका महाविद्यालयीन तरुणीला रिक्षा चालकाने धडक देऊन तिच्या हातातील मोबाईल फोन लुटून पलायन केल्याची घटना नवीन पनवेल भागात घडली होती. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी अत्यंत शिताफीने सदर आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
या घटनेतील महाविद्यालयीन तरुणी खुशदिप सिंग (22) ही नवीन पनवेल भागात रहाण्यास असून ती जवळच असलेल्या क्लासेसमध्ये गेली होती. क्लास सुटल्यानंतर खुशदिप पायी चालत आपल्या घराच्या दिशेने जात असताना, तीच्या पाठिमागून आलेल्या एका रिक्षा चालकाने तीला रिक्षाचा धक्का देऊन तीच्या हातातील 10 हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन खेचुन पळ काढला. रिक्षाचा धक्का लागल्यामुळे खुशदिप खाली पडलेल्या खुशदिप आरडा-ओरड करत रिक्षाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत रिक्षा चालक रिक्षा घेऊन पळुन गेल्याने खुशदिप आपले घर गाठले. त्यांनतर तीने आपल्या भावासह खांदेश्वर पोलीस ठाणे गाठुन पार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी लुटारु रिक्षा चालकाविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला असता
पो.उप आयुक्त, परिमंडळ 2, पनवेल शिवराज पाटील व सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग भागवत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास सोनवणे, पोलीस निरीक्षक, गुन्हे ढाकणे यांनी गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सपोनि प्रवीण पांडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश पोळ, ह.वा.महेश कांबे, सुदर्शन सारंग, चेतन घोरपडे, पो.ना.नवनाथ लवटे, विशाल घोसाळकर, अमित पाटील, शिवगुडे, पो.शि.सचिन सरगर, चेतेश वळवी, संभाजी गाडे आदींच्या पथकाने त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व रेकॉर्ड वरील आरोपी यांची माहिती काढून प्रथम रिक्षा नंबर प्राप्त केला. व त्यानंतर अधिक माहिती घेतली असता काही दिवसांपूर्वी जबरी चोरीच्या गुन्हयातून जामिनावर बाहेर आलेला आरोपी शहानवाज मोहम्मद अस्लम शेख उर्फ शानु, वय 35 वर्षे, रा.ठी. उसर्ली गाव, पनवेल हा या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला रिक्षासह ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर आरोपी हा दि. 23.07.2021 रोजी तळोजा कारागृहातून जामिनावर बाहेर पडला व जुना पत्ता सोडून नवीन ठिकाणी राहत होता. आतापर्यंत त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. त्याच्यावर यापूर्वी शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे 6 गुन्हे, युनिट 6 गुन्हे शाखा मुंबई 2 गुन्हे, गोवंडी पोलीस स्टेशन येथे 1, मानखुर्द पोलीस स्टेशन येथे 1, देवनार पोलीस स्टेशन येथे 1, खांदेश्वर पोलीस स्टेशन येथे 2, पनवेल शहर पोलीस ठाणे येथे 1 असे विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेमुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वपोनि देवीदास सोनावणे यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment