नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमधील विविध क्रीडा प्रकारांत भारत देशाचे प्रतिनिधित्व करणा-या महाराष्ट्रातील 10 खेळाडूंना शुभेच्छा देण्याकरिता आयोजित "स्वाक्षरी मोहीम अभियान" शुभारंभ महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे यांच्या वतीने देण्यात आलेल्या मोठ्या स्वाक्षरी फलकावर आयुक्तांनी स्वाक्षरी करून तसेच सेल्फी पॉईंटवर शुभेच्छापर छायाचित्र काढून 'ऑलिम्पिक डे' च्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थित अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. धनराज गरड, उपआयुक्त श्री. मनोज महाले व श्रीम. क्रांती पाटील यांनीही स्वाक्षरी फलकावर शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी व अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू श्रीम. अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी व शुटिंगबॉलचे राष्ट्रीय कर्णधार श्री. रेवप्पा गुरव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सागरी जलतरणपटू श्री. शुभम वनमाळी, तायक्वांदो खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच श्री. सुभाष पाटील, विभागीय व्हॉलिबॉल असो. चे सरचिटणीस श्री. धनंजय वनमाळी आणि इतर खेळाडू उपस्थित होते.
महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी यावेळी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्रातील 10 खेळाडू तेजस्विनी सावंत (50 मी. रायफल शुटींग), राही सरनोबत (25 मी. पिस्तूल शुटींग), चिराग शेट्टी (बँडमिंटन पुरूष दुहेरी ), प्रवीण जाधव (आर्चरी रिकर्व्ह), अविनाश साबळे (ॲथलेटिक्स - 3000 मी. स्टीपलचेस), भाग्यश्री जाधव (पॅरा ॲथलेटिक्स - गोळाफेक), स्वरूप उन्हाळकर (पॅरा शूटींग 10 मी. रायफल), सुयश जाधव (पॅरा स्विमींग 50 मी. बटरफ्लाय, 200 मी. वैयक्तिक मिडले), विष्णू सरवानन ( सेलींग लेसर स्टँडर्ड क्लास), उदयन माने (गोल्फ) यांना ऑलिम्पिकमधील उज्ज्वल यशासाठी समस्त नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
ऑलिम्पिक डे निमित्त नुकतीच महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबईतील 18 वर्षावरील राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना कोव्हीड लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली असून यामध्ये 56 क्रीडापटू व क्रीडा प्रशिक्षकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
Comments
Post a Comment