कोविड 19 लसीकरणाच्या सुरूवातीपासून गर्भवती महिलांचा समावेश लसीकरणामध्ये करण्यात आला नव्हता. आता आरोग्य तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार तसेच शासकीय आदेशानुसार गर्भवती महिलांच्या लसीकरणाला मान्यता मिळाली आहे. त्यास अनुसरून महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी, नेरुळ व ऐरोली या तीन महापालिका सार्वजनिक रुग्णालयात सकाळी 9 ते 5 या वेळेत उद्या दि.17 जुलैपासून कोव्हीड लसीकरणाला सुरुवात होत आहे.
कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये गर्भवती माता मोठया प्रमाणात बाधित झाल्याचे आढळून आले. तसेच कोविड 19 आजारामुळे गर्भवतींमध्ये अकाली प्रसूती, जंतू संसर्ग, मृत्यू काही प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे गरोदरपणात कोविड 19 आजार झाल्यास आजाराची तीव्रता वाढत असल्याचेही दिसून आले.
या अनुषंगाने गर्भवती मातांना कोविड लसीकरणाव्दारे संरक्षित करणेविषयी विविध पातळ्यांवर संशोधन करण्यात येत होते. यामध्ये कोविड 19 आजाराचा गर्भवती माता तसेच गर्भावर होणारा परिणाम याचा सखोल अभ्यास करण्यात आला. त्यास अनुसरून गर्भवती महिलांचे लसीकरण करावयाचे झाल्यास कोणत्या तिमाहीत करावे याबाबत तज्ज्ञांव्दारे संशोधन करण्यात आले. त्यास अनुसरून राष्ट्रीय तांत्रिक लसीकरणविषयक मार्गदर्शक समुह - NTAGI (National Technical Advisory Group for Immunizaion) तसेच जागतिक आरोग्य संघटना यांच्या शिफारशीनुसार गरोदर मातांना लसीकरण करण्याचा केंद्र आणि राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.
त्याप्रमाणे गर्भवती मातांना कोव्हिड 19 लसीकरण करण्याबाबत विविध शिफारसी करण्यात आल्या असून त्यानुसार -
* गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या कालावधीत केव्हाही लसीकरण करता येईल.
* गरोदरपणाच्या कालावधीत देण्यात येणाऱ्या Td लसी सोबत कोविड 19 लस देता येईल. मात्र सोबत दिली न गेल्यास 15 दिवसाच्या अंतराने देता येईल.
* गर्भवती महिलेस मधुमेह, उच्च रक्तदाब इ.आजार असले तरीही लसीकरण करता येईल.
शासनामार्फत प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या रुग्णालयातील तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांचे याबाबत प्रशिक्षण घेण्यात आले आहे. तसेच NMOGS, IAP, IMA, NIMA, HIMPAM अशा खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांचे आणि खाजगी लसीकरण केंद्रांवरील आरोग्यकर्मींचे प्रशिक्षण घेण्यात आले असून इतर कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
गर्भवती महिलांना कोव्हीड 19 पासून संरंक्षण मिळावे यादृष्टीने 17 जुलैपासून पहिल्या टप्प्यात महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली रुग्णालयात कोव्हीड लसीकरणाला सुरुवात होत असून लवकरच इतरही रुग्णालयात गर्भवती महिलांसाठी कोव्हीड लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व गर्भवती महिलांनी या विशेष लसीकरण सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment