पनवेल (प्रतिनिधी) रोटरी क्लबच्या माध्यमातून खर्या अर्थाने समाजाची जी सेवा होते, त्याबद्दल कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच उरले नाहीत, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज(शुक्रवार, दि. २५) खांदा कॉलनी येथे रोटरी क्लबच्या कार्यक्रमात केले.
रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन सिनर्जी पार्टनर्स आणि नेत्र ज्योत आय हॉस्पिटल, खांदा कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपकरणांचा लोकार्पण सोहळा आमदार प्रशांत ठाकूर यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास रोटरी ३१२१ च्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.रश्मी कुलकर्णी, डीआरएफसी रो. डॉक्टर गिरीश गुणे, आयकर आयुक्त संजय देशमुख, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीता पाटील, क्लब अध्यक्ष हार्मेश तन्ना, सचिव कल्पेश परमार, प्रोजेक्ट संपर्क डॉक्टर एन. सी.जनार्दन, नेत्रज्योत आय हॉस्पिटलचे ट्रस्टी, डॉक्टर, इतर क्लबचे अध्यक्ष व रोटेरियन उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपण या क्लबचे सदस्य असल्याचा मला अभिमान वाटत असून त्याच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांच्या कडून आम्हा राजकारण्यांना घेण्यासारख्या स्फूर्तिदायक कितीतरी गोष्टी आहेत हे सांगण्यासाठी आता माझ्याकडे शब्दच नाहीत, असे म्हंटले. या प्रोजेक्टसाठी मोतीबिंदूचे रुग्ण शोधण्यासाठी ग्रामीण भागात, आदिवासी किवा शहरातील गरीब वस्तीत जाऊन काम करावे लागेल. कारण या अशा व्यक्ति तपासणीसाठी वेळ काढू शकणार नाहीत आणि त्यांना हा खर्च करणे परवडणार नाही अशी भीती वाटते . त्यामुळे ते दुखणी अंगावर काढत असतात अशा लोकांपर्यंत पोहचावे लागणार आहे. त्यासाठी एखादी योजना करणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी रोटरीने प्रोजेक्ट हातात घेतला की तो पूर्ण करते. या प्रोजेक्टला मिळालेली ग्लोबल ग्रँट ही तुमच्या केलेल्या कामाला मिळालेली दाद असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आणि रोटरीच्या माध्यमातून सातत्याने समाजसेवा केली जात असल्याचे अधोरेखित केले.
यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. रश्मी कुलकर्णी, डीआरएफसी रो. डॉक्टर गिरीश गुणे, आयकर आयुक्त संजय देशमुख यांनी ही यावेळी आपले अनुभव सांगितले व शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. प्रमोद गांधी यांनी या प्रोजेक्ट संदर्भात सविस्तर माहिती दिली.
Comments
Post a Comment