दिबासाहेबांच्या नावाला वाढता पाठिंबा- वारकरी महामंडळ, व्यापारी संघ, उरण वारकरी सांप्रदाय यांनीही दिला पाठिंबा
पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य, पनवेल महापालिका व्यापारी संघ, तसेच उरण तालुका वारकरी सांप्रदाय सामाजिक मंडळाने लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय सर्व पक्षीय कृती समितीला जाहीर पाठिंबा दिला आहे.
पनवेल येथे झालेल्या बैठकीत वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य, पनवेल महापालिका व्यापारी संघ, तसेच उरण तालुका वारकरी सांप्रदाय सामाजिक मंडळाने पाठिंबा पत्र दिले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, कॉ. भूषण पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, राष्ट्रवादीचे गुलाबराव वझे, जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, भाजपचे युवा नेते दशरथ भगत, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्यच्यावतीने ह. भ. प. अजय महाराज पाटील, पनवेल महानगरपालिका व्यापारी संघच्यावतीने पनवेल व्यापारी संघाचे अध्यक्ष नारायण ठाकूर, कळंबोली व्यापारी संघाचे अध्यक्ष कमल कोठारी, संजय जैन व इतर व्यापारी संघाचे पदाधिकारी आणि उरण तालुका वारकरी संप्रदाय सामाजिक मंडळाच्यावतीने अध्यक्ष गोपीनाथ ठाकूर व पदाधिकारी यांनी पाठिंबा पत्र कृती समितीला सुपूर्द केले.
वारकरी महामंडळाने दिलेल्या पाठिंबा पत्रात म्हंटले आहे कि, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील लोक जीवनाचा मुख्य आधारस्तंभ आहे. अनादीकाळापासून समुद्रातील दिप स्तंभाप्रमाणे दिशा दर्शविण्याचे काम करत आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांनी कामगार, शेतकरी, कष्टकरी, भूमिपुत्र, ओ. बी. सी. समाजाला तसेच बहुजनांना दिशा दर्शविण्याचे काम आयुष्यभर करून अविरत सेवा केली आहे. तसेच ऐतिहासिक जनआंदोलन उभारून साडेबारा टक्केचा न्याय मिळवून दिला. नगराध्यक्ष, पाचवेळा, आमदार. दोन वेळा खासदार, विरोधी पक्षनेते अशी पदे भुषवून समाजासाठी सभागृहात आवाज बुलंद करून न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. दिबासाहेबांचे कार्य महान आहे, आणि विमानतळ भूमिपुत्रांच्या जागेत होत आहे त्यामुळे भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळालेच पाहिजे, अशी भूमिका या जाहीर पाठिंब्यातून वारकरी महामंडळ, व्यापारी संघ, उरण वारकरी सांप्रदाय यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment