कळंबोली येथे राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
आरक्षण परत मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही
आमदार प्रशांत ठाकूर यांचा महाविकास आघाडी शासनाला इशारा
पनवेल ः प्रतिनिधी मराठा आरक्षणानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले आहे. महाविकास आघाडी सरकारने योग्य बाजू न मांडल्याने तसेच त्यांच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाने संपूर्ण राज्यात शनिवारी चक्काजाम आंदोलन केले. या मुद्द्यावरून पनवेलमध्येही राजकारण तापले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली येथे भाजप कार्यकर्त्यांनी पनवेल-सायन महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.
वाशिम, भंडारा, अकोला, नागपूर आणि गोंदिया या पाच जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त ओबीसी आरक्षणाविरोधातील याचिकेवर 4 मार्च 2021 रोजीच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्दबातल ठरवले. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका 29 मे 2021 रोजी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. यामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारे 27 टक्के राजकीय आरक्षण यापुढील कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देता येणार नाही. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात नीट बाजू न मांडल्याने ओबीसींच राजकीय आरक्षण संपल्याचा आरोप करत विरोधी पक्षांमधील ओबीसी नेते आणि ओबीसी संघटना आक्रमक होताना दिसतायेत. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने शनिवारी राज्यभर चक्का जाम आंदोलन केले.
पनवेलमध्ये भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कळंबोली सर्कलजवळ भाजप कार्यकर्त्यांनी पनवेल-सायन महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे!, भारतमाता की जय, वंदे मातरम, महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो अशा प्रकारच्या घोषणा देऊन भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याबद्दल राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली. या वेळी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज भुजबळ, नगरसेवक बबन मुकादम, हरेश केणी, तेजस कांडपिळे, अजय बहिरा, अमर पाटील, नीलेश बावीस्कर, विकास घरत, ओबीसी महिला जिल्हा अध्यक्ष नगरसेविका सीता पाटील, महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग अध्यक्ष अनिता पाटील, सुशीला घरत, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, कुसुम म्हात्रे, हेमलता म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे, जि. प. सदस्य अमित जाधव, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, बबन बारगजे, रामनाथ पाटील, राजेश गायकर, कमल कोठारी आदी पदाधिकारी, कार्यकर्तेही उपस्थित होते. या वेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
राज्य सरकार आंधळे आणि बहिरे झाल्यामुळे या सरकारला हलवून जागे करण्यासाठी आज आंदोलन करावे लागत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेळी बोलताना सांगितले. अॅड. मनोज भुजबळ यांनी राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आंदोलन करावे लागत आहे. ही ओबीसी समाजाची एक प्रकारची थट्टाच असल्याचे म्हटले, तर विक्रांत पाटील यांनी मराठा समाजाचे आरक्षण घालवले. आता ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण घालवले. असेच सुरू राहिले तर ओबीसी समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि नोकरीचे आरक्षण जायला वेळ लागणार नसल्याकडे लक्ष वेधले.
कोट
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेले आहे. असे असताना महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने सर्वसामान्यांच्या विरोधात भूमिका घेतली जात आहे. या सरकारच्या विरोधातली ही लढाई आहे. कारण ते हुकूमशाही प्रवृत्तीने काम करतात. जनतेच्या भावनांचे राज्य शासनाला कोणतेही देणेघेणे नाही. दोन दिवसांपूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी सर्वजण एकत्र जमलो आणि ओबीसी राजकीय आरक्षण रद्द करण्यात आल्याबद्दल या ठिकाणी आंदोलन केले. जोपर्यंत आमचा हक्क आम्हाला परत मिळत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष आपला लढा सुरूच ठेवेल.
-आमदार प्रशांत ठाकूर
Comments
Post a Comment