प्रकल्पग्रस्तकरिता दूग्ध उद्योगाप्रमाणे सहकारी तत्त्वावर पर्यायी जागेची शिफारस
नवी मुंबई: शहराच्या मध्यवर्ती भागात पारसिक हिल भागात खाणकाम सुरू करण्याची घोषणा अलीकडेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र त्यांच्या या घोषणेला पर्यावरणप्रेमींकडून कडाडून विरोध करण्यात आला.
एनजीओ नाटकनेक्ट फाउंडेशन’ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात नवी मुंबईपासून दूर अंतरावर पर्यायी जागेची शिफारस खाणकामाकरिता करण्यात आली. या सुचविण्यात आलेल्या जागेवर मनुष्य वस्ती नाही. या भागातील उत्खनन कार्य हे सहकारी तत्वावरील दूग्ध उद्योगाप्रमाणे सहकारी तत्त्वावर राबविणे शक्य आहे. जेणेकरून प्रकल्पबाधित व्यक्तिंना मदत मिळेल, असे नाटकनेक्टचे संचालक बी एन कुमार म्हणाले.
पारसिक डोंगराच्या भागातील खाणकाम स्वत: दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी थांबविले होते. या भागातील उत्खननाचा फटका शहरातील पर्यावरणाला बसून अनर्थ घडू शकतो हे त्यांनी वेळीच ओळखले होते. कालांतराने डोंगर भागात सुरुंग स्फोट सुरू झाले. मात्र या भागात केवळ 138.07 हेक्टर जागेवर खाणकामाची परवानगी असताना खाण संचालकांनी 264.1 हेक्टर जागेत खोदकाम केले. अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन झाल्याने वन विभागाकडून या कामावर आक्षेप घेतला.
त्यामुळे नवी मुंबईच्या केंद्रस्थानी असलेल्या भागात सध्या महासाथीच्या (pandemic) काळात खाणकाम पुन्हा सुरू करण्याची कल्पना सार्वजनिक आरोग्य तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने “भयावह” असल्याचे कुमार म्हणाले.
या पार्श्वभूमीवर नाटकनेक्टने #SaveParsikHills आणि #QuarryWorries कॅम्पेन सोशल मीडियावर चालवले आहे.
नवी मुंबई प्रकल्प ग्रस्त व्यक्तिंना दिलासा म्हणून तसेच 40,000 रोजगार निर्मितीला साह्य करण्यापोटी एकनाथ शिंदे यांनी पाच वर्षांपूर्वी थांबविण्यात आलेले खाणकाम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन अगोदरच स्थानिक खाणकाम चालकांच्या शिष्टमंडळाला दिले.
“अशा अनेक सामाजिक कल्याणाच्या योजना आहेत, ज्या अंतर्गत प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन शक्य आहे. तसेच फार पूर्वी बंद करण्यात आलेले सुरुंग स्फोट पुन्हा डोंगरात सुरू न करण्याची गरज आजिबात नाही,” असे मत कुमार यांनी व्यक्त केले.
“आम्ही विकास किंवा 50 वर्षांहून जुन्या, नवी मुंबई प्रकल्प ग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या विरोधात नाही,” असेही कुमार म्हणाले. सध्याच्या कोविड परिस्थितीत सार्वजनिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात याची महत्त्वपूर्ण जाणीव स्थानिक नेत्यांना आणि शासनाला करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.
खारघर येथील चालू अवस्थेतील खाणीला पर्यावरण प्रेमींचा विरोध आहे. त्यामुळे जैवविविधतेला धक्का लागत असून प्रदूषणात भर पाडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
खाणकाम पुन्हा सुरू करण्यासाठी पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया पूर्व-संमत असावी असे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या पुणे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. नवी मुंबई महानगर पालिकेसोबत वन आणि पर्यावरण विभागांनी खाणकामाला विरोध दर्शवला असल्याचे स्मरण कुमार करून देतात.
पारसिक हिलमध्ये पुन्हा-पुन्हा सुरुंग स्फोट करू नये याची खातरजमा करून मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी एनजीओ श्री एकविरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी यावेळी केली. काही खाण चालकांच्या लालसेपोटी सुरुंग स्फोटाचे प्रमाण 70 to 80% पर्यंत वाढल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्या भागात डोंगराचे उत्खनन करण्यात आले, त्याच्या पायथ्याशी सिडकोकडून प्रधानमंत्री आवास योजना गृहसंकुलाचे बांधकाम सुरू असून भविष्यात या भागात भू-स्स्खलन होण्याची भीती पवार यांनी व्यक्त केली. या गृह संकुलांना खाणकामाचा थेट फटका बसू शकतो असे ते म्हणाले.
खारघर येथील पर्यावरण कार्यकर्त्या ज्योती नाडकर्णी म्हणाल्या की, अनेक वेळा नियमांची पायमल्ली करून खाणकाम केल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. मात्र प्रशासन या भागातील उत्खननामुळे उदभवणाऱ्या धोक्यांबद्दल बेपर्वा दिसते. “अधिकारी वर्गाच्या नकारात्मक भुमिकेमुळे, नागरिकांना त्रास भोगावा लागतो,” अशा खरमरीत शब्दांत त्यांनी सद्यस्थिती स्पष्ट केली.
निवासी परिसरात या जगात कोणतेही सरकार खाणकामाची परवानगी कशी देऊ शकते, याविषयीचे आश्चर्य पर्यावरण कार्यकर्ते नरेश चंद्रा सिंग यांनी व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की, “सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाशी कोणाला देणे-घेणे राहिलेले नाही.”
Comments
Post a Comment