पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः भारत विकास परिषदे द्वारे देशभर बालिका सप्ताह उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. भारत विकास परिषद संपूर्ण भारतात कार्यरत असलेली एक सामाजिक संस्था आहे. संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण या पंचसूत्री नुसार सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे विविध उपक्रम देखील देशभरात आयोजित केले जातात.
याच अनुषंगाने ऍनिमिया-मुक्त भारत’, बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या दोन अभियाना अंतर्गत मुलींच्या शिक्षण आणि आरोग्य या विषयात काम करीत आहोत. राष्ट्रीय ’कन्या दिना’ निमित्त 17 जानेवारी ते 24 जानेवारी 2021 रोजी भारत विकास परिषदेतर्फे महिला व बाल विकास आयामा अंतर्गत ’बालिका सप्ताहा चे आयोजन करण्यात येत आहे. या आठवड्यात भारत विकास परिषदेच्या सर्व शाखा, देशभरात सर्वत्र एकाच पद्धतीचे कार्यक्रम घेणार आहेत. बेटी है तो सृष्टि है या संकल्पनेवर आधारित सर्व कार्यक्रम आहेत. पनवेल शाखेतर्फे या उपक्रमाचे आयोजन देवशेतवाडी (खोपोली जवळ) खालीलप्रमाणे करणार आहेत. त्यामध्ये दिनांक 17 जानेवारी:- 10 ते 18 वयोगटातील मुलींसाठी हिमोग्लोबिन चाचणी मोहीम राबविली जाईल. 18 जानेवारी:- या दिवशीच्या कार्यक्रमात अशक्त (ऍनिमिक) मुलींना लोहयुक्त आहार आणि लोहाच्या गोळ्या,गुळ, चणे तसेच त्या-त्या परिवारात लोखंडी कढई देणे तसेच मुलींना शालेय स्टेशनरी प्रदान करण्यात येईल. 19 जानेवारी:- देशभरातील मुली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतील व त्यातील उत्कृष्ट कार्यक्रम समारोपाच्या कार्यक्रमात दाखवले जातील. यासाठी ’संस्कारीत बेटीयाँ, महकता आँगन’, ’राष्ट्रके उत्थान में बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ शिक्षित कन्या है वरदान हे विषय प्रामुख्याने दिलेले आहेत. 20 जानेवारी:- गरजू मुलींना लोकरीचे कपडे किंवा गणवेश किंवा इतर कपडे वाटले जातील. 21 जानेवारी:- डॉ.शिल्पा परहर यांचे मुलींसाठी मासिक पाळीच्या वेळी बाळगायची स्वछता आणि लैंगिकता या दोन विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तसेच हरिपाठ आणि भजन कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी पनवेल च्या महापौर सौ कविता चौतमोल उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला आहे त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. त्याशिवाय प्रत्येक शाखेतून दोन मुलींचे शैक्षणिक प्रायोजकत्व घेतले जाईल. हुशार मुलीं आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याकडे लक्ष दिले जाईल तसेच त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आणि आत्मनिर्भर होईपर्यंत मुलींना परिषदेकडून आर्थिक पाठबळ दिले जाईल. 24 जानेवारी:- अशाप्रकारे आठवडाभर राबवलेल्या उपक्रमाचा शेवट एका ऑनलाइन कार्यक्रमाने होईल,ज्यामध्ये भारत विकास परिषदेच्या सर्व सदस्यांचा समावेश असेल तसेच केंद्रीय पदाधिकारी उपस्थित असतील. ह्या कार्यक्रमात प्रत्येक क्षेत्रांमधून एक सर्वोत्कृष्ट कार्यक्रम प्रदर्शित केला जाईल. मुलींच्या अध्यापन,आरोग्य आणि स्वावलंबन या विषयी जनजागृती करण्यासाठी अशाप्रकारे संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. सर्व शाखांमधील महिला सदस्य उत्साहाने संपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन करीत असल्याची माहिती महिला संयोजिका भारत विकास परिषद, पनवेल शाखेच्या सौ. ज्योती कानिटकर यांच्यासह सहकार्यांनी दिली.
Comments
Post a Comment