ओवे कॅम्प धरण परिसरात पार्ट्या आणि गर्दुल्यांचा वाढता वावर ; कारवाईची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांची मागणी
पनवेल, दि.13 (वार्ताहर) :खारघर येथील ओवे कॅम्प धरण गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. असे असले तरी डोंगराच्या लगत असलेल्या या जलाशयाच्या भोवती मोठ्या प्रमाणात दारूच्या पार्ट्या होत आहेत. याठिकाणी मद्यपी धरणा सुद्धा उतरत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतीही उपाययोजना येथे होत नाही. त्यामुळे याप्रश्नी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांना साकडे घातले आहे. त्यांना यासंदर्भात पत्रसुद्धा देण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेवर पाण्यासाठी अवलंबून राहावे लागते. दरम्यान आजूबाजूच्या जलस्त्रोताकडे दुर्लक्ष केले जात असल्याने टंचाई निवारण होताना दिसत नाही. खारघर येथील ओवे कॅम्प धरणाचा जर विकास केला त्याचबरोबर त्यामधील गाळ काढल्यानंतर या ठिकाणचे पाणी पिण्यासाठी वापरले जाऊ शकते. त्याचबरोबर डोंगराच्या लगत असलेल्या या धरण परिसराचा पर्यटन म्हणून सुद्धा विकास होऊ शकतो. परंतु याकडे दुर्लक्ष झालेले आहे. परिणामी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात दारूच्या पार्ट्या होतात. सुट्टीच्या दिवशी याठिकाणी तळीरामांची एक प्रकारे जत्राच भरते. जथेची जथे येथे येताना दिसतात. परिणामी दारूच्या बाटल्यांचा अक्षरशा खचच या ठिकाणी दिसून येत आहे. याव्यतिरिक्त जेवण आणि इतर वस्तू तशाच फेकून दिल्या जातात. प्लास्टिक आणि पत्रावळ्या अनेक ठिकाणी विखुरलेल्या दिसून येतात. एकंदरीतच याठिकाणी स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे. दारू पिऊन धरणात उतरण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे काहींचा जीव जाण्याचा धोका याठिकाणी निर्माण होतो. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पनवेल महानगरपालिकेने दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन ओवे कॅम्प धरण परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने महापालिकेला सूचित करावे अशी मागणी केली. त्यानुसार मनपा आयुक्तांनी या सूचनेची दखल घ्यावी असे आदेश पालकमंत्र्यांनी निर्गमित केले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष आजिनाथ सावंत, सुभाष सावंत, दत्ताराम मोकल उपस्थित होते.
Comments
Post a Comment