उपजिल्हा रूग्णालयात पत्रकारांसाठी पाच खाटा आरक्षित.... सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी ‘पुन्हा एकदा करून दाखविले’!
पनवेल/प्रतिनिधी : पनवेल उपजिल्हा रूग्णालयात पत्रकारांसाठी पाच खाटा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. तर कोविडबाधित होम आयसोलेशन पत्रकारांसाठी विनामुल्य सल्ला आणि मार्गदर्शन तसेच औषधांबाबत सहकार्य करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. दोन्ही निर्णयांमुळे पनवेलच्या पत्रकारांना मोठा आधार मिळाला आहे. आतापर्यंत पत्रकारांसह सहा जणांच्या कुटुंबांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाच आहे. शिवाय पुण्यातील पांडूरंग रायकर नावाच्या पत्रकाराचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील सर्वच पत्रकारांच्या आरोग्याचा प्रश्न अधोरेखित झाला आहे. त्यावर पनवेलसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू यांच्या मागणीनंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
रायकर यांच्या मृत्यूनंतर सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार कांतीलाल कडू यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी त्वरीत पत्रव्यवहार करून पत्रकारांकरीता कोविडसाठी आरक्षित खाटांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावर पनवेल उपजिल्हा रूग्णालयात डॉ. नागनाथ येमपल्ले यांच्याशी कडू यांनी चर्चा केल्यानंतर पाच आरक्षित खाटांची व्यवस्था करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. उद्यापासून ती व्यवस्था कार्यान्वित होणार आहे.
विशेष म्हणजे कडू यांच्या सामाजिक आवाहनाला सेवाभावी वृत्तीचे ज्येष्ठ डॉक्टर गिरीश गुणे यांनी कडू यांच्याशी तात्काळ संपर्क साधून कोविड बाधित पत्रकारांना होम आयसोलेशन व्हायचे असल्यास त्यांना विनामुल्य औषधोपचार सल्ला, मार्गदर्शन आणि ऑन लाईन पद्धतीने केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. डॉ. गुणे यांनी आतापर्यंत ही व्यवस्था अडीचशे ते तीनशे जणांना पुरविली आहे. त्या सर्वांनी कोविड़ साथीवर मात केली आहे. त्यामध्ये काही पत्रकारांचा समावेश आहे. ज्या पत्रकारांना डॉ. गुणे यांच्याशी संपर्क साधायचा असेल त्यांनी 9820302155 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे डॉ. गुणे यांनी आवाहन केले आहे.
पनवेल उपजिल्हा रूग्णालयात पत्रकारांसाठी पाच खाटा आरक्षित करण्यात आल्या असून पत्रकारांनी डॉ. नागनाथ येमपल्ले यांच्याशी 9819280711 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अलिबाग आणि परिसरातील पत्रकारांनाही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी अलिबाग येथील सामान्य रूग्णालयात उपचारपद्धतीसाठी पाच खाटा आरक्षित ठेवल्या आहेत, अशी माहिती त्यांनी कांतीलाल कडू यांना दिली.
महापालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख यांच्याकडे कडू यांनी पनवेलच्या पत्रकारांसाठी दहा खाटांची मागणी केली असून उपजिल्हा रूग्णालयासह कामोठे एमजीएम येथे सुद्धा ती व्यवस्था व्हावी असे सुचविण्यात आले आहे. त्याबाबत त्यांच्याकडून अद्याप ठोस निर्णय आला नसला तरी लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षा कडू यांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment