लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर
पनवेल(प्रतिनिधी) दिवंगत ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबियांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यातर्फे पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
कर्जत येथील माथेरान येथे राहणारे पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनाने अकस्मात निधन झाले. सतत हसतमुख असणारे आणि लोकांच्या मदतीला धावणारे संतोष पवार यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय वर्तुळातील व्यक्तींना तसेच सामान्य नागरिकांनाही धक्का बसला.
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.रामशेठ ठाकूर यांनी संतोष पवार यांचे चिरंजीव मल्हार पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मल्हार यांना धीर दिला. तसेच घडलेल्या घटनेची माहितीही घेतली. पत्रकार म्हणून संतोष पवार यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांना सामाजिक कामात कायम सहकार्य केले. संतोष पवार यांचे सुपुत्र मल्हार पवार हे सध्या क्वारंटाईन असल्याने तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे ही आर्थिक मदत सुपुर्द करण्यात येईल.
संतोष पवार यांनी काही वर्षे ‘दैनिक रामप्रहर’चे प्रतिनिधी म्हणूनही काम केले होते. संतोष पवार हे मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस होते. रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवले. उत्तम पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय विश्लेषक म्हणून त्यांची ओळख होती. शासनाच्या अधिस्वीकृती समितीवर ते कार्यरत होते. तसेच माथेरान नगरपालिकेवर नगरसेवक म्हणूनही ते निवडून गेले होते.
संतोष पवार यांनी कर्जत येथे ‘रायगड माझा’ व ‘महाराष्ट्र न्यूज २४’ नावाचे स्थानिक चॅनेलही सुरु केले आणि या चॅनेलचा चांगल्याप्रकारे जमही बसू लागला होता. परंतु, काळाने त्यांच्यावर अकस्मात घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment