ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या काळात विद्यार्थ्यांकडून इतर शुल्क न मागण्याच्या विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश
पनवेल : पनवेल विभागातील काही शाळांकडून पालकांना शाळा प्रशासनाने शिक्षण शुल्क, वाहतूक आणि इतर शुल्क भरण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांकडून इतर शुल्क मागू नये अशी मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी गट शिक्षण अधिकारी पनवेल यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून त्यानुसार गटशिक्षण अधिकारी पनवेल यांच्याकडून शाळांना पालकांकड़े फी भरण्याची सक्ती करू नये अशा प्रकारचे आदेश निघाले आहेत.
राज्यात ठिकठिकाणी ऑनलाइन शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे पालकांकडून शाळा शुल्क वसूल करत असल्याचे निदर्शनास येत आहे. काही शाळा इतर शुल्क देखील मागत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. याला नागरिक त्रासले होते. काही दिवसांपासून दिल्ली पब्लिक स्कूल (DPS), पनवेल येथील शाळेने पालकांकड़े मागे फी भरण्याचा तगादा लावला. या लॉकडाऊन काळामध्ये या शाळेने फी संदर्भात काही स्पष्ट धोरण सांगावे अशी पालकांची मागणी असतानासुद्धा कोणतेही स्पष्टीकरण पालकांना दिले नाही. त्यामुळे याची माहिती 400 हून पालकांनी पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांना दिली. याबाबत सविस्तर माहिती घेतली असता शाळेकडून त्या पालकांची अनेक विषयात पिळवणूक करण्यात आल्याचे म्हात्रे यांना समजले. सदर विषय ताबडतोब प्रितम म्हात्रे यानी गटशिक्षणाधिकारी पनवेल आणि अलिबाग यांच्याकडे सविस्तरपणे पत्राद्वारे कळविली.
गटशिक्षणाधिकारी यांना विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी राज्य सरकारचे फी मागण्यांसंदर्भात सक्ती करू नये असे निर्देश असतानासुद्धा पनवेल परिसरातील शाळा आदेश धुडकावून लावत सर्रासपणे पालकांना फी साठी पिळवणूक करत असल्याचे सांगितले. ज्या गोष्टीचा विद्यार्थी उपभोग घेत नाहीत, ज्यामध्ये ट्रान्सपोर्ट, लायब्ररी, कॉम्प्युटर रूम अशा प्रकारचे इतर सुविधा आणि त्याचे सुद्धा पैसे शाळा सक्तीने मागत आहे यासाठी यावर निर्बंध घालण्यासाठी शिक्षणाधिकार्यांनी त्वरित त्या प्रकारचे आदेश काढावे आणि शासनाने दिलेल्या निर्देशांचे पुन्हा सर्व शाळांना एकदा आठवण करून द्यावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी केली होती. त्यानुसार गटशिक्षण अधिकारी पनवेल यांच्याकडून शाळांना पालकाकड़े फी भरण्याची सक्ती करू नये अशा प्रकारचे आदेश निघाले आहेत.
पनवेलमधील सर्व शाळांपर्यंत ती पोहोचवण्यात आली आहे. अशा प्रकारची फी संदर्भात किंवा इतर कोणतीही पिळवणूक शाळेकडून जर कोणत्याही पालकांची किंवा विद्यार्थ्यांची होत असेल तर माझ्याशी संपर्क साधावा. असे आवाहन प्रितम म्हात्रे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment