पनवेल / प्रतिनिधी : लॉकडाऊनसारख्या कठीण काळात सरकार रिक्षाचालकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले नाही व त्यांना आर्थिक मदत देखील केली नाही. याउलट सक्तीने दंडात्मक कारवाई करून त्यांना रिक्षा बंद करण्यास भाग पाडल्याने रिक्षाचालकांवर अन्याय झाला असून यामुळे रिक्षाचालक संतापला आहे. रायगड जिल्हा व नवी मुंबई शहराला लागून असलेल्या उरण तालुक्यामध्ये रिक्षांची संख्या सुमारे सहा हजारांहून जास्त आहे. अनेक उच्च शिक्षित, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शासकीय किंवा खाजगी कंपनीत काम न मिळाल्याने स्थानिक बेरोजगार तरुण रिक्षा व्यवसायात उतरले आहेत. निदान रिक्षा चालवुन तरी आपल्यासह आपल्या कुटुंबांचा चरितार्थ चालविता येईल, या आशेने नाईलाजाने स्थानिक तरुण रिक्षा व्यवसायाला लागले आहेत. मात्र २२ मार्चपासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात रिक्षा चालकांना प्रवासी वाहतूकीस परवानगी नसल्याने त्यांना विविधसंकटाना सामोरे जावे लागत आहे. मुलाबाळांचा शिक्षणाचा खर्च, रिक्षा घेतलेल्या बँकेचे कर्ज, त्याचे हप्ते, कुटुंबियांच्या पालन पोषणाचा खर्च, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास हॉस्पिटलचा खर्च,रेशन अन्न धान्य आदिचा खर्च भागविण्यासाठी रिक्षा चालकाने पैसे आणायचे कुठून ? या सर्वाचा ताण कुटुंब प्रमुख असलेल्या रिक्षा चालकावर पडत आहे. या रिक्षा चालकांना कुणाचाच आधार नाही. असे हे रिक्षा चालक प्रामाणिक कष्ट करून आपली गुजराण करत असल्याने कोणापुढे हात पसरु शकत नाही.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळातही रिक्षा चालकांनी तहसील व पोलिस प्रशासनाला आपल्या रिक्षा बंद ठेवून सहकार्य केले. तसेच याविरोधात मा. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या यांच्या आदेशाने व संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब तसेच महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, चिटणीस मंगेश लाड, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल व रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने झाली मात्र तरी सरकारला जाग येत नसल्याने व कोणताही निर्णय सरकारने घेतला नसल्याने अखेर पुन्हा एकदा सरकारविरोधात पनवेलमधील रिक्षाचालकांनी मुंडन आंदोलन करून निषेध नोंदवला आहे यानंतर देखील शासन दरबारी कोणताही निर्णय न झाल्यास आक्रमक आंदोलनाचा पवित्रा रिक्षाचालकांकडून घेण्यात येईल असा इशाराही यावेळी रिक्षाचालकांनी दिला आहे. यावेळी कोरोना नियम व अटींचे पालन करून रिक्षाचालकांनी आपापल्या घरी व सलूनमध्ये मुंडन करून हातामध्ये सरकार झोपलय जाग करायलाच हवं, रिक्षाचालकांना आर्थिक मदत करा व कर्जमाफी करा यासाठी मी मुंडन करतोय या आशयाचा फलक हातात घेऊन निषेध नोंदविण्यात आला.
Comments
Post a Comment