उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्यावतीने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा 'कोविड योद्धा' सन्मानपत्र देऊन गौरव
पनवेल(प्रतिनिधी) कोरोना विषाणू जागतिक महामारीत नागरिकांना आवश्यक ती सर्वोतपरी मदत करत आधार देणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा पनवेल उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमिताने 'कोविड योद्धा' सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कोरोना व्हायरस आणि त्यामुळे आलेल्या लॉक डाऊन परिस्थितीत गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे संस्थापक दानशूर नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सचिव परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेलच्यावतीने 'मोदी भोजन' कम्युनिटी किचन अर्थात मोफत अन्नछत्र उपलब्ध करून देण्यात आले त्यामार्फत हातावर पोट असलेल्या १ लाख २५ हजारहून नागरिकांना भोजन देण्यात आले. त्याचबरोबर ९० हजारहून अधिक नागरिकांना कोरडा अन्नधान्य देऊन कोरोनाच्या संकटकाळात आधार देण्यात आलेला. तसेच १ लाखाहून अधिक नागरिकांना मास्क व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या, सॅनिटायझर अशा अनेक आवश्यक साहित्य देण्यात आले. कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने केलेले कार्य मोलाचे आणि प्रेरणादायी ठरले. त्यामुळे विविध संस्था संघटनांकडून गौरव होत असताना पनवेल उपविभागीय कार्यालयानेही या मंडळाचा गौरव केला आहे.
संपूर्ण जग 'कोविड १९' या आजाराशी लढा देत आहे. भारतामध्ये सुद्धा या विषाणूच्या प्रादुर्भावाने हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासन आपल्या खात्यातील सर्व विभागांचा समन्वय रोगाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. यामध्ये श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची भूमिका अतिशय महत्वाची व केंद्रस्थानी आहे. असे सन्मानपत्रात नमूद करून गौरविण्यात आले.
Comments
Post a Comment