कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. ह्या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी इतर देशासह भारतातही लाॅकडाऊन राबवण्यात येत आहे. घरी सुरक्षित राहून घेता येणाऱ्या ऑनलाईन शिक्षणाला जगभरातून पसंती दर्शवण्यात येत आहे. ह्याच संधीचा लाभ घेत नवी मुंबईतील खारघरच्या सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध ऑनलाईन जनजागृतीवर उपक्रम हाती घेतले आहेत.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजूषा देशमुख तसेच एन्एस्एसचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ. सुनीता पाल व प्राध्यापक कवल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिनाभरात अनेक उपक्रम राबवण्यात आले आहे.
दि.५ जून रोजी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन आणि ३ जूलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिवस या रोजी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करून साजरा करण्यात आला. सदर जनजागृतीवर उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळला. दि. १९ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देताना विविध आसने शिकवण्यात आले असून दि.२३ जून रोजी आंतरराष्ट्रीय विधवा दिनादिवशी महाविद्यालयीन स्वयंसेवकांनी विधवा स्त्रीचा सन्मान आणि तिला समाजातील स्थान यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रफित सादर केली होती. विविध स्तरातून त्या चित्रफितीचे कौतुक करण्यात आले होते.
तरूणाईत वाढती नशाखोरी आणि अंमली पदार्थाचा वापर रोखण्यासाठी दि. २६ जून रोजी आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थ गैरवापर व अवैध तस्करी प्रतिबंधक दिनाचे निमित्त साधून निबंध स्पर्धा, कविता स्पर्धा, पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रासहित भारतातील अनेक राज्यातील एन्एस्एस् स्वयंसेवकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. तसेच १ जुलै रोजी राष्ट्रीय डाॅक्टर्स दिनानिमित्त विशेष ऑनलाईन मुलाखत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी डाॅ. हर्ष जैन ( एम्.बी.बी.एस् ) यांनी या कोरोना विषाणू महामारीच्या काळात विद्यार्थ्यांनी आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य तंदुरुस्त कसे ठेवावे याबाबत धडे दिले.
सदर ऑनलाईन उपक्रमांबाबत एन्एस्एस् कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पाल म्हणाल्या की, या सेवा योजनेच्या कामात लाॅकडाऊनमध्येही कमतरता भासू नये, यासाठी ऑनलाईन उपक्रमांना प्राधान्य देण्यात येत आहे. तर महाविद्यालयीन तरूणांनी समाजासाठी कायमच तत्पर असावे व घरी सुरक्षित राहून जनजागृती कार्याला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावे, असे मत प्रा. पाटील यांनी मांडले.
Comments
Post a Comment