उद्योगातील कंत्राटी व कायमस्वरूपी कामगारांच्या कोरोना उपचाराचा खर्च संबंधित कंपनीने उचलावा - आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील विविध उद्योगातील कंत्राटी व कायमस्वरूपी कामगारांच्या कोरोना उपचाराचा खर्च संबंधित कंपनीने उचलणेबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधा चौधरी यांच्याकडे महत्त्वपूर्ण सूचनावजा मागणी केली आहे.
यांना संदर्भात आ.ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनही दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्या ह्या सामाजिक सुरक्षतेचे नियम पायदळी तुडवत आहेत. अनेक कंपन्यांमध्ये मास्क न वापरणे,एकत्र जेवण करणे व निकषांपेक्षा (प्रत्येकी तीन फुट) कमी अंतर पाळले जात असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग अनेकांना होत असून कंपनी व्यवस्थापनाकडून याबाबत आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. अनेक कंपन्यांमार्फत त्यांच्या कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांवरती कामावर येण्याची सक्ती केली जात असताना शारिरीक अंतर अथवा सामाजिक सुरक्षेचे निकष पाळले जात नाहीतच मात्र उद्योगामध्ये काम करताना कोरोनाची लागण होवूनही अशा कामगारांच्या उपचारावरती मदत मिळवून देण्याबाबत त्यांना वार्यावरती सोडले जात आहे. या संदर्भात रायगड जिल्ह्यातील कामगार उपायुक्त, सहायक कामगार आयुक्त, कामगार अधिकारी (लेबर आॅफिसर) यांनी सद्यस्थितीत सुरू असणाऱ्या कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती पाऊले उचलण्यात व दक्षता घेण्यात येत आहेत याची माहिती व जबाबदारी घ्यावी. तसेच ज्या कंपन्या अशी काळजी घेण्यास असमर्थ असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे.
सद्यस्थितीत शासकीय रूग्णालयात क्षमता तुटपुंजी असल्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या अनेकांना खाजगी रुग्णालयात एकतर जागा मिळत नाही, ज्यांना मिळते त्यांना प्रचंड खर्च सोसावा लागतो. जर सदर उद्योजकांना त्यांचे उत्पादन घेण्यासाठी कारखाना चालवणे आवश्यक असेल तर त्या उद्योगामधील कंत्राटी व कायमस्वरूपी कामगारांच्या खाजगी हॉस्पिटलच्या खर्चाची जबाबदारी देखील घ्यावी, यासाठी आपणामार्फत योग्य ते निर्देश तातडीने दिले जावेत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणीतून अधोरेखित केले आहे.
Comments
Post a Comment