पनवेल : पनवेल उपजिल्हा रूग्णालयात एकूण दीडशे पैकी ९० बेडला ऑक्सिजन पुरवला जाणार आहे. त्या कामाला सुरूवात झाली असून दोन ते तीन दिवसात ही सुविधा पूर्णपणे उपलब्ध होईल. त्या कोरोना रुग्णांची परवड थांबणार आहे. त्याच्यावर योग्य पध्दतीने उपचार करता येणार आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हा आकडा तीन हजारांच्या ही वर पोहोचला आहे. तसेच ग्रामीण भागातही जवळपास एक हजार कोरोना रूग्ण आढळले आहेत. दररोज त्यामध्ये भर पडत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची मागणी होत होती. पनवेल उपजिल्हा रूग्णालय व कामोठे एमजीएम या कोविड रूग्णालयात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड चीन कमतरता असल्याची वस्तुस्थिती समोर आली होती. त्यामुळे कोरोना रुग्णावर उपचार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर संबंधित रूग्णांना सुध्दा आवश्यक तेवढे उपचार करताना डॉक्टरांचे हात तोकडे पडत होते. विशेष करून इतर आजार असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह याशिवाय वयोवृद्ध कोविड रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची आवश्यकता आहे. परंतु या सुविधांची कमतरता असल्याने गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णावर उपचार करताना अडचणी येत होत्या. ऑक्सिजन बेड नसल्याने अनेकदा कोविड रूग्णांना खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागतात. कोरोना झालेल्या रूग्णांना ठणठणीत बरे करण्यासाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील यांनी केली होती. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयात ९० बेडला ऑक्सिजनची सुविधा करण्यात येणार आहे.
चौकटरूग्णांची गैरसोय कमी होणार
ऑक्सिजन बेड तुलनेत कमी आहेत. त्यामुळे अनेकदा ऑक्सिजनची सुविधा नसल्याने रूग्णांना कोविड रूग्णालयात एएडमिट करून घेता येत नव्हते परिणामी त्यांना इतरत्र म्हणजेच खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करावी लागते. त्या ठिकाणी उपचार घेणे सर्वाच्या खिशाला परवडेल असे नाही. त्याच बरोबर आता खाजगी रुग्णालयात जे बेड आहेत तेही शिल्लक नाहीत. विशेष करून इतर आजार असणारे आणि वृध्द कोरोना बाधित रूग्णांना ऑक्सिजन बेड ची आवश्यकता असते. नेमकी त्याची पनवेल येथील कोविड रूग्णालयात कमतरता होती. पंरतु अशा प्रकारचे एकूण ९० बेड उपलब्ध होणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक नागनाथ यमपल्ले यांनी सांगितले. त्यामुळे आता या ठिकाणी ऑक्सिजन असलेल्या रूग्णांना एडमिट करून घेतले जाईल. प्रकृती ठिक असलेल्या कोरोना रुग्णांवर इंडियाबुल्स येथे उपचार करण्याचा प्रस्ताव असल्याचेही ते म्हणाले.
अतिदक्षता विभागही कार्यान्वित
पनवेल उपजिल्हा रूग्णालयात अतिदक्षता विभागातील १० व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यापैकी चार इतर अतिगंभीर अवस्थेतील रूग्णांकरिता वापरले जाणार आहेत. त्याचबरोबर दहा डायलेसिस मशीन कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. परिणामी किडनी विकाराने त्रस्त असलेल्या रूग्णांना चांगली सोय झालेली आहे.
Comments
Post a Comment