पनवेल महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या व सदर क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्या-त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी-गुरूनाथ पाटील
पनवेल, दि.27 (वार्ताहर): पनवेल महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या व सदर क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी शासकीय तसेच खाजगी क्षेत्रात अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्या-त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शिवसेना पनवेल उपमहानगर संघटक गुरूनाथ पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात शिवसेना पनवेल उपमहानगर संघटक गुरूनाथ पाटील यांनी म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या रूग्णांची संख्या जवळपास 50च्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. प्रशासनाच्या वतीने कोरोना संक्रमण रोखण्याचे अथक प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य जनता ही काही अपवाद वगळता लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत आहे. मात्र आजवर कोरोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची वर्गवारी केल्यास 30 पेक्षा जास्त रूग्ण हे पनवेल तालुक्याबाहेर अत्यावश्यक सेवा देणारे सीआरएफएस जवान, डॉक्टर, परिचारीका, पोलिस असल्याचे आढळून आले आहे. त्याचाच अर्थ पनवेल तालुका रायगड जिल्ह्याबाहेर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या शासकीय व खाजगी अस्थापनातील अधिकारी व कर्मचारी यांची व्यवस्था कामाच्या ठिकाणाजवळ केल्यास क्षेत्राचे संक्रमण थांबेल व परिस्थितीत लवकरच पूर्वपदावर येऊ शकते. यासंदर्भात अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणाजवळ हॉटेल, हॉस्टेल अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी शासनाकडे केली आहे. सर्व सामान्य जनता इमाने एतवारे लॉकडाऊनचे पालन करीत असताना जिल्ह्याबाहेर विशेष करून मुंबईहून येणाऱ्या रोगाचा प्रसार वाढत असल्याने प्रशासनात हतबलतेची भावना व्यक्त होत आहे. मात्र वाढणाऱ्या संख्येमुळे स्थानिक जनतेला उद्योग व पोटापाण्याच्या उद्योगापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे सर्व संबंधितांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
Comments
Post a Comment