पुणे : उच्च राहणीमान असलेली एक तरुणी ज्वेलर्सच्या दुकानात आली. तिने काही दागिने पाहिले व त्यानंतर पसंत नसल्याचे सांगत निघून गेली. तिच्याकडे पाहून कोणीही ही चोरी करेल, असे वाटले नव्हते. पण जेव्हा सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली तेव्हा या तरुणीने १० ग्रॅम वजाच्या ५० हजार रुपये किंमतीच्या २ सोन्याच्या अंगठ्या चोरुन नेल्याचे आढळून आले. गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने या तरुणीला ताब्यात घेतले तेव्हा ती मॉडेल असल्याचे समाेर आले.
स्रेहलता ऊर्फ स्रेहल ऊर्फ साक्षी पाटील (वय २५, रा़ कोथरुड) असे तिचे नाव आहे. तिला एनआयबीएम रोडवरील क्लोव्हर प्लाझा मॉलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. लष्कर भागातील सेंट्रल स्ट्रीटवरील खरी पेढी ज्वेलर्समध्ये ही तरुणी २० जानेवारी रोजी आली होती. खरेदीचा बहाणा करुन तिने दोन अंगठ्या चोरुन नेल्या होत्या. लष्कर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु होता. पोलीस नाईक मोहसीन शेख यांना हा गुन्हा स्रेहलता पाटील हिने केल्याची माहिती मिळाली. बातमीची सत्यता पडताळून पाहत असताना स्रेहलता ही एनआयबीएम रोडवरील क्लोव्हर प्लाझा मॉलमध्ये आली असल्याची माहिती मिळाली. तिला तेथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत प्रथम तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनतर तिने गुन्ह्याची कबुली दिल्यावर तिला अटक करण्यात आली. स्रेहलला पाटील ही सध्या मॉडेलिंग क्षेत्रात करीअर करीत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग, सहायक आयुक्त डॉ़ शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहायक फौजदार यशवंत आंब्रे, महिला हवालदार मोहिते, ढेबे, मोहसीन शेख, गोपाळ मदने यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Comments
Post a Comment