पंढरपूर : परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आणि वर्गात गोंधळ घातल्याने शिक्षकांनी मारहाण केल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे एका १३ वर्षांच्या मुलीने विष प्राशन करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तिने दिलेल्या तक्रारीनुसार पंढरपूर तालुका पोलिसांनी संबंधित शाळेतील दोघा शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कांचन तानाजी घटुकडे (रा. घटुकडे वस्ती, गुरसाळे) असे या मुलीचे नाव आहे. गुरसाळे गावच्या श्री विठ्ठल प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला असून या प्रकरणी या शाळेतील डोंगरे व सय्यद या दोघा शिक्षकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या कांचन घटुकडे हिला शाळेतील नवमाही परीक्षेत कमी गुण मिळाले होते. त्यामुळे तिच्यावर शिक्षक रागावले होते. परीक्षेत कमी गुण मिळाले आणि वर्गात नेहमीच गोंधळ घालते म्हणून डोंगरे व सय्यद या दोघा शिक्षकांनी कांचन हिला मारहाण केली. यात अपमान वाटल्याने कांचनने घरी आल्यावर विष प्राशन केले. डाळिंब बागेत फवारणी केले जाणारे विषारी औषध प्राशन केले. तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने वरील आरोप केले आहेत. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षक डोंगरे व सय्यद या दोघांविरुद्ध अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment