काल शिवजयंती सगळीकडे उत्साहात साजरी होत होती तर नियती कु.सिध्दी सुनील कामठे या २० वर्षीय तरूणीशी काही वेगळाच खेळ खेळत होती. तीला हे ठाऊकच नव्हते की तीची ही शेवटची शिवजयंती असेल. सिध्दि एस वाय ची विद्यार्थिनी असून किल्ले हडसर वर सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशन तर्फे स्वछता अभियान राबवून शिवजयंती साजरी करण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या ३४ सदस्यांबरोबर चिंचपोकळी मुंबई येथून आली होती. सकाळी ९ वा. किल्ले हडसरच्या खिळ्याच्या वाटेने किल्ले हडसर वर स्वच्छता करत पोहचायचे हा त्यांचा मानस होता. अनेक ट्रेकचा अनुभव असलेली सिध्दी हातात श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा घेऊन लिड करत होती. सोबतीला पल्लवी होती. एक एक करत ती पल्लवी सोबत खिळ्याची वाट चढूत होते. खिळ्याची चढाई करून आता ती तटबंदीची भिंत ओलांडणार होती. हातात शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीमा असलेला भगवा स्वत:कडे ठेवत प्रतीमेला पुजन करण्यासाठी असलेली पिशवी ती पल्लवीकडे देताच तीचा पाठीमागे अचानक तोल गेला. व क्षणात हातात भगवा झेंडा घेऊन ती घरंगळत खाली गेली. क्षणात होत्याचं नव्हतं होतं व सिध्दी वरून ४५० फुट खाली कोसळते. ती वेळ होती सकाळची १०:३० ची. घाबरलेल्या स्थितीत इतर सदस्यांना काय करावे सुचेनासे होते. सोबत असलेल्या रितेशने वनविभाग जुन्नर चे रमेश खरमाळे वनरक्षक व माजी सैनिक यांना तुरंत फोन केला. वनरक्षक रमेश खरमाळे यांनी लगेच अॅंबुलन्स घेऊन येतो म्हणून रितेशला सांगत धिर देतात. प्रशांत कबाडी अॅंबुलन्सचे मालक यांना फोन करताच ते पण घटनास्थळी जाण्यासाठी लगेच पोहचतात. क्षणाचा विलंब न करता खरमाळे, वनपाल शशिकांत मडके,विनायक साळुंके व प्रशांत कबाडी अॅंबुलन्स घेऊन चौघे अगदी २० मिनीटांत हडसर गाठतात. वनरक्षक खरमाळे व वनपाल मडके यांची नियुक्ती जुन्नर वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजितजी शिंदे यांनी शिवजयंती निमित्ताने जुन्नर तालुक्यातील किल्ल्यांवर आपात्कालीन काही घटना घडलीच तर मदत करण्यासाठी वनविभागाकडून कर्तव्यावर नेमले होते. खरमाळे व सोबतीला असलेले साथीदार तीव्र उतारावर टनटनींच्या झुडपात अडकलेल्या सिध्दीला बाहेर काढतात व अनेक प्रसंगांना तोंड देत तीला अॅंबुलन्सपाशी हडसर येथे पोहचतात. येथे जुन्नर पोलिस स्टेशनची टीम पोहचलेली असते त्यांच्या मदतीने सिध्दीला अंबुलन्समधुन जुन्नर सरकारी रुग्णालयात दाखल करतात. परंतु तोपर्यंत सगळं काही संपलेल असतं. सिध्दी जगाचा निरोप घेते तो पण श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा भगवा हाती घेऊनच. सिध्दीच्या वडीलांनी जगाचा पहीलाच निरोप घेतलेला असून आई व छोटी बहिण असा तीचा परीवार आहे. आईच्या मनावर खुप मोठा आघात झाला आहे. मुंबईकर या दु:खद प्रसंगी सिध्दीच्या आईला मदतीचा हात देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा घेऊन शिवजन्मोत्सवी स्वच्छता अभियान राबवून सिध्दी जगाला संदेश देऊन गेलीय की गडकोट जीवापेक्षा जास्त जपा त्यांना स्वच्छ ठेवा व संवर्धन करा. अशा या माऊलीस त्रिवार मानाचा मुजरा व भावपुर्ण श्रद्धांजली. मदतीला धावून आलेली रेस्कु टिम रमेश खरमाळे (माजी सैनिक खोडद) वनरक्षक घाटघर,शशिकांत मडके (वनपाल आपटाळे),विनायक साळुंके (वडज)
प्रशांत कबाडी अॅंबुलन्स मालक,रितेश पानसरे (घाटघर) सागर तिडके हडसर ग्रामस्थ व सह्याद्रीक्कर्स फाऊंडेशनचे सदस्य आपण या प्रसंगी मदतीचा हात दिलात येणाऱ्या काळात आपणाकडून अशेच कार्य घडत राहो. व कामठे परीवारास या दु:खातुन सावरण्याचे धाडस परमेश्वर देवो हीच सदिच्छा. कृपया विनंती असेल मित्रांनो सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर बागडताना स्वत:ची काळजी घ्या. येथे चुकीला माफी नक्कीच नाही. वनविभाग जुन्नरचे विशेष आभार की आपत्तीसाठी आपण दखल घेतलीत आणि प्रशांतजी कबाडी यांनी तुरंत अॅंबुलन्स सेवा उपलब्ध करून दिलीत.
Comments
Post a Comment