मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त थोर साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात वि वा शिरवाडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा केला गेला. पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शुद्धलेखन पुस्तके,निबंधमाला पुस्तके वाटप करून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
तालुक्यातील भोकरपाडा येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने विद्यार्थ्यांना शुद्धलेखन पुस्तके तसेच निबंध पुस्तक माला यांचे वाटप करण्यात आले.यावेळी मुलांना खाऊचे देखील वाटप करण्यात आले. पनवेल तालुका पत्रकार मंचाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, अत्यंत समृद्ध अशा मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपली मराठी भाषा समृद्ध होण्याकरता फार काही वेगळे व मोठे करण्याची गरज नाही. आपण एकमेकांशी मराठीतूनच संवाद साधला तरीसुद्धा पुष्कळ काम होईल. देशातील अन्य राज्यात आपण पाहतो की तेथील नागरिक एकमेकांशी संवाद साधत असता प्रादेशिक भाषेतच बोलतात. आपण मात्र अन्य भाषिकांशी बोलताना मराठी भाषेची कास चटकन् सोडतो. ते पुढे म्हणाले की सामाजिक उपक्रमांतून समाजाचे ऋण फेडणे हे आमच्या संघटनेचे ध्येय आहे,ते डोळ्यापुढे ठेऊन असे कार्यक्रम आम्ही सातत्याने राबवत राहू असे आश्वासन देतो.
पत्रकार अविनाश कोळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कुसुमाग्रजांच्या साहित्य संपदेचे अत्यंत सोप्या शब्दात मूल्य विश्लेषण केले. तसेच विद्यार्थी मित्रांशी त्यांना समजेल उमजेल अशा लहेज्यात संवाद साधला.तर प्रास्ताविक सादर करताना दैनिक कर्नाळा चे मुख्य संपादक मंदार दोंदे यांनी सांगितले की मराठी भाषेचा वृक्ष बहरलेला राहण्याकरता त्या वृक्षाची मुळे अर्थात शाळकरी विद्यार्थी यांच्यावर मराठीचे योग्य संस्कार झाले पाहिजेत. भाषेची गोडी लागावी यासाठी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त निरनिराळ्या कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी भाषेची गोडी लागावी या उद्देशाने आम्ही पुस्तकांचे वाटप केले आहे.
या कार्यक्रमाला पनवेल तालुका पत्रकार मंचाचे अध्यक्ष माधव पाटील, दैनिक कर्नाळा चे मुख्य संपादक मंदार दोंदे, सरव्यवस्थापक विवेक पाटील, पत्रकार अविनाश कोळी, पत्रकार राजू गाडे,नामदेव पांगा फुलोरे, मुख्याध्यापक राजगे सर,कल्पेश फुलोरे,हनुमान फुलोरे,रुपेश फुलोरे, साजन फुलोरे,हृषिकेश फुलोरे,किशोर फुलोरे,योगेश फुलोरे,हरिभाऊ म्हात्रे,संजय पाटील आदी मान्यवरांच्या सह विद्यार्थी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने जिल्हा परिषद शाळांतील मुलांच्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात त्याबद्दल रा जि प शाळा भोकर पाडा चे मुख्याध्यापक राजगे यांनी मंचाचे मनःपूर्वक आभार मानले.
Comments
Post a Comment