अलिबाग : काही वर्षांपासून प्रलंबित राहिलेला मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा झाला असून अलिबाग तालुक्यात मेडिकल कॉलेज उभे राहणार आहे. त्यासाठी जागेचा प्रश्न येत्या आठ-दहा दिवसांत सुटेल, अशी माहिती रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.
अलिबागेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खा. सुनील तटकरे बोलत होते. जिल्ह्यात होणार्या विकास कामांबाबत सुरू असलेल्या पाठपुराव्याबाबत त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. मेडिकल कॉलेजचा विषय हा भिजत घोंगडे होऊन पडला होता. जागेअभावी हा विषय मागे पडला. दरम्यान, या विषयाला पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. 75 मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव असून महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव सादर केल्यास त्याला परवानगी मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिल्यानंतर मेडिकल कॉलेजसाठी प्रयत्न सुरू झाले.
दरम्यान, जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय असल्याने त्याला लागूनच मेडिकल कॉलेज उभे करावे लागेल, असा राज्यशासनाचा दंडक आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यात जागेचा शोध घेण्यात आला. येत्या आठ-दहा दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल, असे खासदार तटकरे म्हणाले. 25 एकर जागा मेडिकल कॉलेजसाठी लागणार आहे. यामध्ये मेडिकल कॉलेज, हॉस्टेल्स, जिल्हा रुग्णालयाला जोडून इतर सुविधा देण्याचा प्रयत्न असेल.
जिल्ह्यात दोन ठिकाणी महिलांसाठी हॉस्पिटल
मेडिकल कॉलेजप्रमाणेच 100 खाटांचे महिलांसाठी रुग्णालय उभारण्याचा प्रयत्न यापूर्वी झाला. परंतु जागेअभावी तो मागे पडला. परंतु आता जिल्ह्यात दोन ठिकाणी महिलांसाठी 50 खाटांचे रुग्णालय उभे करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही खा.तटकरे यांनी सांगून दंतचिकित्सा कॉलेजलाही राज्यशासनाने मंजुरी दिल्याने त्यासाठीही जागेचा शोध सुरू असल्याचे खा.सुनिल तटकरे म्हणाले. मुंबई-गोवा महामार्ग, वडखळ ते इंदापूर परतीच्या कामाला पुन्हा एकदा गती देण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगून या वर्षाच्या अखेरपर्यंत हा पहिला टप्पा पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
अलिबाग तालुक्यातील 30 वर्षांपासून कागदावरच
असलेल्या सांबरकुंड धरणाच्या कामाची निविदा पावसाळ्यापूर्वी निघेल आणि पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही खा.तटकरे यांनी सांगितले. रेवस रेड्डी मार्ग यासह इतर विकासकामांबाबत सुरू असलेल्या पाठपुराव्यासंदर्भातही खा.सुनिल तटकरे यांनी पत्रकारांना माहिती दिली. रत्नागिरीतील वादातीत नाणार प्रकल्प रायगडात होणार असल्याच्या चर्चेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर आपण याबाबत सद्यस्थितीची माहिती घेऊ, असे खा.तटकरे म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment